जगात सर्वात प्रतिष्ठित आणि ग्लॅमरस समजल्या जाणाऱ्या ‘मेट गाला २०२४’ या इव्हेंटला नुकतीच सुरुवात झाली आहे. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी न्यूयॉर्कमधील मॅनहटन येथे या सोहळा आयोजित करण्यात येतो. यावेळी बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टने मेट गालामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. आलियाचा परदेशातील हा देसी अंदाज सर्वांनाच भावला. तिने साडी नेसून आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केल्याने सध्या सोशल मीडियावर आलियाचं कौतुक करण्यात येत आहे. या सोहळ्याला दरवर्षी जगभरातील नामांकित लोक उपस्थित राहतात.
‘मेट गाला २०२४’ मध्ये आलियाने मिंट ग्रीन रंगाची सुंदर अशी डिझायनर साडी नेसली होती. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. बॉलीवूडचा प्रसिद्ध डिझायनर सब्यसाचीने तिच्यासाठी ही खास साडी डिझाइन केली होती. यावर आलियाने सुंदर दागिने आणि क्लासिक हेअरस्टाइल केल्याने तिच्या संपूर्ण लूकला पूर्णत्व आलं होतं.
आलिया भट्टच्या या भरजरी साडीची अनेक वैशिष्ट्ये आता समोर आली आहेत. तब्बल १६३ कारागिरांनी मिळून आलियाची ही खास साडी डिझाइन केलेली आहे. या साडीला तयार करण्यासाठी एकूण १९६५ तास लागले आहेत. यावरील फ्लोरल मोटिफ वर्कमुळे ही साडी अधिकच उठून दिसत आहे. याशिवाय या साडीत सब्यसाचीने एक लाँग ट्रेल जोडली आहे. यामुळे आलिया भट्टला रॅम्प वॉक करताना एकदम रॉयल लूक मिळाला. सध्या आलियाचे ‘मेट गाला २०२४’मधील असंख्य फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
https://www.instagram.com/p/C6pfI0zvppH/?utm_source=ig_web_button_share_sheet
दरम्यान, आलिया भट्टच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, आगामी काळात ती ‘जिगरा’ चित्रपटात झळकणार आहे. ‘द आर्चीज’ फेम अभिनेता वेदांग रैना ‘जिगरा’च्या निमित्ताने पहिल्यांदाच आलियाबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. आलियाचा या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये देखील सहभाग असणार आहे. हा चित्रपट जुलै महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. याशिवाय गेल्यावर्षी आलिया रणवीर सिंहबरोबर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात झळकली होती. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळवलं होतं.


