अजित पवार मुख्यमंत्री होणे हे स्वप्नच आहे. ही प्रत्यक्षात घडणारी गोष्ट नाही. राज्यातही महाविकास आघाडीचेच सरकार येणार. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना (ठाकरे गट) अगदी एकदिलाने काम करीत आहोत. त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल,’ असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. ‘इंडिया’ आघाडीत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी घेण्याविषयी आम्ही सकारात्मक विचार करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
अण्णासाहेब कोरपे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गुरुवारी अकोला क्रिकेट क्लब मैदानावर सहकार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अनिल देशमुख, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे आदी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आभासी पद्धतीने या कार्यक्रमाला हजर होते.
पवार म्हणाले, ‘राज्य कुणाच्या हातात द्यायचे ते द्या पण, काळ्या आईशी इमान राखणाऱ्या, देशाची भूक भागविणाऱ्या शेतकऱ्यांना साथ द्या शक्ती द्या. कापूस आयात करण्यासंबंधीचा निर्णय घेतला जातो. कापूस उत्पादन घसरले आहे. अनेक तालुक्यांत कापूस कमी झालेला आहे. सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. सोयाबीन उत्पादक अडचणीत आहे. पण, आजच्या राज्यकर्त्यांना शेती आणि शेतकरी यांची आस्था नाही, अशी खंत पवार यांनी बोलून दाखविली. कांदा निर्यात थांबली. कांदा फेकला गेला. संत्र्याची तीच स्थिती होती. कापसाची स्थिती बिकट आहे. एकूणच हे चित्र शेती आणि शेतकरी यांच्या भवितव्याच्या दृष्टीने चांगली नाही. शेकडो कोटी थकविणाऱ्या, बुडविणाऱ्यांची कर्जमाफी करणाऱ्यांना शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विसर पडतो,’ अशी टीकाही त्यांनी केली. शरद पवार यांच्या धोरणात्मक निर्णयामुळे दुसरी हरितक्रांती शक्य झाल्याचे गौरवोद्गार डॉ. चारुदत्त मायी यांनी काढले.