Sunday, June 15, 2025
Homeआरोग्यविषयकलसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना अजित पवारांचं आवाहन, म्हणाले…!

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींना अजित पवारांचं आवाहन, म्हणाले…!

९ जुलै २०२१,
देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र दिसून येत आहे. मात्र, असं असताना दुसरीकडे लोकांमध्ये करोनाच्या नियमांविषयी बेजबाबदार वर्तन दिसून येत असल्याचं अनेक ठिकाणी दिसून येत आहे. बाजारपेठांमध्ये, पर्यटन स्थळी लोक पुन्हा एकदा गर्दी करू लागले आहेत. विशेषत: लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांकडून करोनासंदर्भातल्या नियमांना टाळण्याची वृत्ती दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना आवाहन केलं आहे. “दोन्ही डोस झालेल्या सर्वांना माझी विनंती आहे की दोन्ही डोस झाले, तरी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग ही काळजी घ्यावीच लागणार आहे”, असं ते म्हणाले.

पुण्यातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अजित पवार यांनी यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे. “पुण्यात मृत्यूदर नक्कीच कमी झाला आहे. पण लोकांनी आजही मास्क वापरण्याची नितांत गरज आहे. आढावा घेताना एक गोष्टी अशी लक्षात आली की ज्यांचे दोन्ही डोस झालेत, त्यांनी मास्क वापरण्याची टाळाटाळ केली आणि दुर्दैवाने करोनामुळे अशा काही रुग्णांचं निधन झालं. त्यामुळे दोन्ही डोस झालेल्या सर्वांना माझी विनंती आहे की दोन्ही डोस झाले, तरी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग ही काळजी घ्यावीच लागणार आहे”, असं ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, मास्कची गरज व्यक्त करताना अजित पवार यांनी इस्त्रायलचं उदाहरण दिलं. “जगात पहिल्यांदा इस्त्रायलनं लसीकरण झाल्यानंतर मास्क वापरणं बंद केलं. पण पुन्हा त्यांना मास्कवर यावं लागलं. आजही जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगितलं जातंय की दोन्ही डोस झाल्यानंतरही मास्क वापरायलाच हवं. गर्दी टाळायलाच हवी. फुटबॉल, विम्बल्डनमध्ये आपण बघतोय कुणीच मास्क वापरत नाही. टोकियोमध्ये मात्र त्यांनी प्रेक्षकांना बंदी घातली आहे. काही राष्ट्र त्यांच्या सुरक्षेसाठीचे निर्णय घेतात. कधीकधी तो हिताचा असतो. पण थोडं ढिलं सोडलं की त्याचा त्रास होतो ही वस्तुस्थिती आहे”, असं देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

४ नंतर पुण्यात दुकानं बंद झालीच पाहिजेत
पुण्यात अनेक ठिकाणी ४ वाजेनंतर दुकानं बंद होतात पण फेरीवाले उभे राहात असल्याचं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. “पुण्यात संध्याकाळी ४ वाजेपर्यंतच दुकानं उघडी राहणार आहेत. दुकानं बंद होऊनही हातगाडीवाले सर्रासपणे उभे राहतात. त्यामुळे ४ च्या पुढे सक्तीने सगळं बंद व्हायला पाहिजे. पर्यटनाच्या ठिकाणी गर्दी केली जात आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटी वाढत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी कोविड निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत”, असं ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments