Wednesday, February 11, 2026
Homeअर्थविश्वबारामती जन्मभूमी, पिंपरी-चिंचवड कर्मभूमी म्हणणारे विकासाचे शिल्पकार अजित पवार अनंतात विलीन

बारामती जन्मभूमी, पिंपरी-चिंचवड कर्मभूमी म्हणणारे विकासाचे शिल्पकार अजित पवार अनंतात विलीन

पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात अमिट ठसा उमटवणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाने उद्योगनगरीवर शोककळा पसरली असून, शहराच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे नेतृत्व हरपल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात पिंपरी-चिंचवडमधून झाली. १९९१ मध्ये त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली. त्यावेळी पिंपरी-चिंचवडचा परिसर बारामती मतदारसंघात समाविष्ट होता आणि याच निवडणुकीत ते लोकसभेत निवडून गेले. त्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात त्यांचा सक्रिय प्रवेश झाला.

“बारामती माझी जन्मभूमी असली, तरी पिंपरी-चिंचवड माझी कर्मभूमी आहे,” असे ते नेहमी आवर्जून सांगत. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यानंतर अजित पवार यांनी शहराच्या विकासाची धुरा समर्थपणे सांभाळत आधुनिक पिंपरी-चिंचवड घडवला. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची पिंपरी-चिंचवड महापालिकेत सलग १५ वर्षे एकहाती सत्ता राहिली. या कालावधीत शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्यांनी दूरदृष्टीपूर्ण नियोजन राबवले.

भविष्यातील गरजांचा विचार करत अजित पवार यांनी शहर विकासाचा सखोल अभ्यासावर आधारित आराखडा तयार केला. महापालिकेमार्फत ई-सुविधा प्रणाली लागू करून नागरिकांना ऑनलाईन बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. जेएनयूआरएम अंतर्गत गरीबांसाठी गृहप्रकल्प उभारण्यात आले, निगडी ओटास्कीम साकारली गेली, तसेच रस्ते, उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, उद्याने आणि आरोग्य सुविधा विकसित करण्यात आल्या.

शहरातील आरोग्य सेवांसाठी मोठी रुग्णालये उभारण्यात आली. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासारखे ७०० बेडचे अत्याधुनिक रुग्णालय सुरू करण्यात आले, तसेच पाच नवीन सुसज्ज रुग्णालयांची उभारणी करण्यात आली.

गुणवत्तेशी कधीही तडजोड न करणारे नेतृत्व म्हणून अजित पवार ओळखले जात होते. ते अनेकदा पहाटे शहरात येऊन विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करत. त्यामुळे कामाच्या दर्जावर काटेकोर नियंत्रण राहिले आणि प्रकल्प वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण झाले.

केंद्र सरकारकडून जवाहरलाल राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत तब्बल २६०० कोटी रुपयांचा निधी मिळवून घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, बससेवा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मार्गी लावण्यात आले.

मोशी येथे २०० एकर जागेत पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याचा निर्णय, शहराच्या मध्यवर्ती भागात ३३ एकर क्षेत्रात मध्यवर्ती व्यापार केंद्र प्रकल्प, तसेच सायन्स पार्क यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांनी उद्योगनगरीला नवी ओळख मिळाली.

शहराच्या वाहतूक व्यवस्थेसाठी प्रशस्त रस्ते, अनेक उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, भुयारी मार्ग आणि पादचारी पूल उभारण्यात आले. निगडी-दापोडी, औंध-रावेत, नाशिक फाटा-वाकड यांसारख्या प्रमुख मार्गांवर बीआरटी कॅरिडॉर सुरू करण्यात आले, ज्यामुळे सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम झाली.

महिलांसाठी बचत गटांच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज योजना, शिवणयंत्र वाटप, संगणक व वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यामुळे महिला सक्षमीकरणाला मोठी चालना मिळाली.

उद्योगनगरीला संशोधनाचे केंद्र बनवण्यासाठी पिंपरी-चिंचवड ऑटो क्लस्टर उभारण्यात आला, तर लहान मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून सायन्स पार्कची उभारणी करण्यात आली.

पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने पुढील ३० वर्षांचा विचार करून निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रावर स्काडा प्रणाली बसवण्यात आली. भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातील आरक्षित पाणी साठा मंजूर करून शहराची पाण्याची गरज सुरक्षित करण्यात आली.

अजित पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहराशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. शहरावर मुलासारखे प्रेम करणारा नेता हरपल्याने उद्योगनगरी पोरकी झाल्याची भावना व्यक्त करत अनेक नागरिकांना अश्रू अनावर झाले.

२५ वर्षांत शहराचा चेहरामोहरा बदलणारे, विकासाचे नवे पर्व घडवणारे हे नेतृत्व आज अनंतात विलीन झाले असले, तरी त्यांच्या कार्याचा ठसा पिंपरी-चिंचवडच्या प्रत्येक कोपऱ्यात कायम स्मरणात राहणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments