पुणे शहर गेल्या दहा वर्षांपासून पाणीटंचाई, वाढती वाहतूक कोंडी, ढासळती आरोग्यसेवा, पावसाळ्यातील पुरस्थिती आणि वाढतं प्रदूषण या समस्यांच्या “अलार्म”चा आवाज ऐकत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज पत्रकार परिषदेत पुणेकरांसमोर आपला ठोस आणि जबाबदारी स्वीकारणारा जाहीरनामा मांडला.
“हा केवळ घोषणांचा दस्तऐवज नाही, तर पुण्याच्या भविष्यासाठी जबाबदारी स्वीकारणारा जाहीरनामा आहे,” असे स्पष्ट करत नेतृत्त्वाने सांगितले की, “आज मी नेता म्हणून नाही, तर पुणेकर म्हणून बोलत आहे.” गेल्या सहा महिन्यांत वॉर्डनिहाय सर्वेक्षण, पुणेकरांशी थेट संवाद आणि त्यांच्या दैनंदिन समस्यांचा सखोल अभ्यास करून हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे.
या जाहीरनाम्याचा केंद्रबिंदू आहे “पाच काम – पक्का वादा”.
या जाहीरनाम्याचा पाया आहे “पाच काम – पक्का वादा”.
✅ दररोज नळाद्वारे, पुरेशा दाबासह पाणीपुरवठा.. टँकर माफियांवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर येणार नाही. पाण्याची गळती थांबवून पाईपलाईन उन्नतीकरण आणि वेळेत दुरुस्त्या करणार.
✅ रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल करणार. मिसिंग लिंक प्रकल्प आणि विकास आराखड्यातील रस्ते ठराविक कालमर्यादेत पूर्ण करणार. नव्यानं समाविष्ट गावांमध्येही शहरमानकांनुसार रस्ते उभारणार.
✅ पुणे खड्डेमुक्त शहर करणार. खड्डे बुझवण्यासाठी कंत्राटदाराला वेळेची मर्यादा राहणार. कामाकडे दुर्लक्ष केल्यास दंड आणि संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकणार. टिकाऊ रस्ते उभारण्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहणार.
✅ स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन कामकाज नीट होणार. आज निर्माण होणाऱ्या ९८० MLD सांडपाण्यापैकी प्रक्रिया क्षमतेतील तफावत भरून काढत नद्यांमध्ये जाणारं प्रदूषण थांबवणार. स्वच्छता ही मोहीम नव्हे, तर दररोजच्या कामातील व्यवस्था बनणार.
✅ आरोग्यसेवा सुलभ आणि परवडणारी होणार. वॉर्डनिहाय दवाखाने, सुधारित व नवीन रुग्णालये, खाटांची वाढ, मातृसेवा, कर्करोग उपचार, बर्न वॉर्ड, ICU, टेलिमेडिसिन आणि गरीबांसाठी विमा सहाय्य सेवा उपलब्ध राहणार.
विकास हा पर्यावरणाचं नुकसान करून होणार नाही. नाले, ओढे, ड्रेनेज स्वच्छ करणं आणि हरित क्षेत्रांचं संरक्षण करणं, अतिक्रमण रोखणं, पूर व प्रदूषणावर दीर्घकालीन उपाय करणं, पर्यावरणाशी समतोल राखणं हाच विकासाचा खरा मार्ग आहे. व्यवस्था करताना सन्मान आणि स्थैर्य महत्त्वाचं आहे. पुनर्वसन सन्मानानं झालं पाहिजे. उपजीविकेचं संरक्षण केलं गेलं पाहिजे. दैनंदिन जीवन सुलभ करण्यासाठी मोफत PMPML बस प्रवास, मोफत मेट्रो प्रवास, छोट्या घरांसाठी शून्य मालमत्ता कर सवलत आणि शिक्षण थांबू नये म्हणून मोफत टॅब्लेट्स दिले जाणार.
शिक्षण हा विकासाचा पाया मानत १५० “पुणे मॉडेल स्कूल” उभारण्याचा संकल्प जाहीरनाम्यात आहे. जागतिक दर्जाचे सार्वजनिक शिक्षण, आधुनिक पायाभूत सुविधा आणि गुणवत्तेची हमी देण्यावर भर देण्यात आला आहे.
पुढील पाच वर्षांसाठीचा हा जाहीरनामा कौतुकासाठी नसून, मोजमापासाठी असल्याचे स्पष्ट करत, पाणी, रस्ते, आरोग्यसेवा किंवा प्रदूषणाबाबत अपयश आल्यास जाब विचारण्याचे आवाहन पुणेकरांना करण्यात आले. “हा जाहीरनामा वचन देणारा म्हणून नाही, तर जबाबदारी स्वीकारणारा पुणेकर म्हणून पुण्यासमोर ठेवत आहे,” असे ठामपणे सांगण्यात आले.
हा जाहीरनामा उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


