अर्थमंत्रालय मिळाल्यानंतर शुक्रवारी अजित पवार यांनी सिल्हवर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत आता त्यांनी खुलासा केला आहे.
अर्थमंत्रालय मिळाल्यानंतर शुक्रवारी अजित पवार यांनी सिल्हवर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. अजित पवारांच्या या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं होतं. अखेर आता या भेटीबाबत त्यांनी आपल्य नाशिक दौऱ्यात मोठा खुलासा केला आहे. राजकारण वेगळं मात्र परिवारही तितकाच महत्त्वाचा आहे. सिल्हवर ओकवर जाऊन आपण प्रतिभा पवार यांच्या तब्येतीची चौकशी केल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
राजकारण वेगळं मात्र परिवारही तितकाच महत्त्वाचा. सिल्हवर ओकवर जाऊन आपण प्रतिभा पवार यांच्या तब्येतीची चौकशी केली. तिथे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचीही भेट घेतली. मात्र यादरम्यान शरद पवारांसोबत कोणतीही राजकीय चर्चा केली नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आज अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत. अर्थ खातं मिळाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच दौरा आहे. नाशिकमध्ये त्यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपला पुढचा प्लॅन देखील सांगितला आहे.
राज्याच्या विकासासाठी आम्ही युतीसोबत येण्याचा निर्णय घेतला. अर्थमंत्रालयाचा पदभार स्विकारल्यानंतर मी सर्वप्रथम पाऊस आणि अर्थखात्याचा आढावा घेतला. अद्यापही राज्यात पुरेसा पाऊस पडलेला नाहीये. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच संकट आहे. काटकसरीनं पाणी वापरावं लागणार आहे. वातावरण बदलाचा पावसावर परिणाम होत आहे. सरकार म्हणून जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणं गरजेचं आहे. प्रशासनाचा अनुभव असल्यामुळे जनतेसाठी चांगलं काम करेल, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.