Saturday, March 2, 2024
Homeमहाराष्ट्ररेडी मिक्स काँक्रिट प्रकल्पांमुळे वाकड, ताथवडे, पुनावळेतील हवा प्रदूषित, तात्काळ कार्यवाहीची परिसरातील...

रेडी मिक्स काँक्रिट प्रकल्पांमुळे वाकड, ताथवडे, पुनावळेतील हवा प्रदूषित, तात्काळ कार्यवाहीची परिसरातील गृहनिर्माण संस्थांची मागणी

महापालिका हद्दीलगत असलेल्या मारूंजीमधील रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्रकल्पांमुळे वाकड, ताथवडे, पुनावळेतील हवा प्रदूषणात वाढ झाली आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील गृहनिर्माण संस्थांनी केली आहे.

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही याबाबत तक्रार करण्यात आली आहे. महापालिका हद्दीलगत असलेल्या मारूंजीत दहा आरएमसी प्रकल्प आहेत. हे प्रकल्प चोवीस तास सुरू असतात. रात्री-अपरात्री वाहनांची वर्दळ आणि प्रकल्पांमधील मशीनचा मोठा आवाज येतो. हवा प्रदूषणासोबतच ध्वनी प्रदूषणातही वाढ होत आहे. परिसरात गृहप्रकल्पांची बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. परिणामी, या भागात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य असते.

परिसरात शाळा, महाविद्यालय आणि रहिवासी क्षेत्र असल्यामुळे विद्यार्थी, नागरिकांना श्वसनाचा त्रास होत आहे. हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. अशुद्ध हवा, ध्वनी प्रदूषण नागरिक त्रस्त झाले असून, प्लांटवर तत्काळ कारवाई करावी. नागरी आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाबाबत कार्यवाही करावी. स्थानिक नागरिक, गृहनिर्माण संस्थाधारकांच्या हिताच्या दृष्टीने कायमस्वरूपी ठोस उपाययोजना कराव्यात. प्रदूषणमुक्त परिसर आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली.

पिंपरी-चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे उपाध्यक्ष सचिन लोंढे म्हणाले की, आरोग्य आणि पर्यावरणाबाबत महापालिका प्रशासनाने सतर्क असले पाहिजे. रहिवासी क्षेत्रातील आरएमसी प्रकल्पांमुळे नागरिकांना ध्वनी आणि हवा प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागतो. वाहतूक समस्याही वाढलेली आहे. यावर प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात.

महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता हरविंदर बन्सल म्हणाले की, आरएमसी प्रकल्प महापालिका हद्दीत नाहीत. या प्रकल्पांमुळे वाकड, ताथवडेतील नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याबाबत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला पत्रव्यवहार करून कारवाई करण्याची सूचना केली जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments