एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करावं, ही एसटी कर्मचाऱ्यांची मागणी राज्य सरकारने अमान्य केल्याने आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आज थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी धडक दिली आहे. यावेळी संपकरी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली. त्यामुळे या परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र कर्मचाऱ्यांनी थेट ‘सिल्व्हर ओक’समोर ठिय्या मांडण्याची भूमिका घेतली. त्यामुळे एसटी कर्मचारी आणि पोलीस प्रशासनामध्ये संघर्षही झाला.दरम्यान, भाजपचे विविध नेते आणि वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या चिथावणीमुळेच एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्याविरोधात आंदोलन केल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीकडून देण्यात आली आहे
दुसरीकडे पोलीस आंदोलक कर्मचाऱ्यांना एका स्कूलबस मध्ये बसवून आझाद मैदानाकडे नेत आहेत. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते देखील सिल्व्हर ओक येथे दाखल झाले असून, शरद पवारांच्या समर्थानार्थ घोषणबाजी सुरू केली आहे. त्यामुळे वातावरण अधिकच चिघळण्याची चिन्ह निर्माण झाली आहे.