पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बाईक टॅक्सी मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. याचा फटका इतर रिक्षाचालकांना बसतो. त्यांना भाडं मिळणं कठीण होतं. याचा परिणाम त्यांच्या कमाईवर होतो. बाईक टॅक्सी बंद करण्याची मागणी त्यांनी यापूर्वीदेखील केली होती. काही प्रमाणात आंदोलनदेखील केलं होतं. मात्र त्यांची मागणी मान्य न झाल्याने त्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. संपात एकूण 12 रिक्षाचालक संघटना सहभागी होणार आहेत.
रिक्षा संघटनेने आपल्यातले मतभेद बाजूला ठेवून रिक्षा चालकांच्या हितासाठी एकत्र येणे आवश्यक आहे. ज्या संघटना अजूनही आंदोलनामध्ये सहभागी झाल्या नाहीत, त्यांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेने केलं आहे. रिक्षा चालकांचे प्रश्न अत्यंत बिकट आणि गंभीर होत आहे त्यांच्या प्रश्नांसाठी एकत्र येऊन लढण्याची वेळ आहे. अन्यथा शेतकऱ्यांप्रमाणे रिक्षा चालकांना देखील आत्महत्या करावी लागेल. यापूर्वी देखील आठ रिक्षा चालकांनी आत्महत्या केल्या आहेत, असं महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितलं आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील रिक्षा संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला आहे. या संपात 50 ते 60 हजार रिक्षाचालक सहभागी होणार आहे. संप 28 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होणार आहे. या संपामध्ये जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘बघतोय रिक्षावाला’ संघटनेने इतर रिक्षाचालकांना केलं आहे.
कोरोनानंतर रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ
कोविडनंतर अनेक रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनानंतर त्यांच्या व्यावसायावर परिणाम झाला. त्यानंतर अनेक पुणेकरांनी बाईक टॅक्सी किंवा कॅबला प्राधान्य दिलं. त्यामुळे रिक्षाचालक संतापले आहेत. एका भाकरीमध्ये शंभर तुकडे सरकार करत असल्याचा आरोप रिक्षा चालकांनी केला आहे.