मराठी पाट्या लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपल्यानंतर इंग्रजी पाट्यांविरोधात राज्यभरात मनसैनिक आक्रमक झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्याच दरम्यान आज मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या नेतृत्त्वाखाली जंगली महाराज रोडवरील हॉटेल, दुकानांवरील इंग्रजी नावाच्या पाट्यांविरोधात आंदोलन करण्यात आले. तर यावेळी दुकानांवर दगडफेक करीत बोर्ड फोडण्यात आले.
मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर म्हणाले की, मागील कित्येक वर्षांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार दुकान, हॉटेलवर असणार्या इंग्रजी पाट्यांविरोधात मनसैनिक आंदोलन करीत आहे. आमच्या भूमिकेची दखल न्यायालयाने देखील घेतली. राज्यातील दुकान, हॉटेल यावरील मराठी पाट्या लावण्याची सर्वोच्च न्यायालयानं दिलेली मुदत संपल्यानंतर आज आम्ही आंदोलन केले आहे. ही आंदोलनांची सुरुवात आहे. पण भविष्यात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला. दरम्यान, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.