कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली. या अपघात प्रकरणानंतर अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक (Arrest) झाली आहे. आता या अग्रवाल पिता -पुत्रांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अग्रवाल पिता-पुत्रांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.
पुण्यातील चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये बांधकाम व्यावसायिकाला धमकावल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव शेरी भागात राहणाऱ्या एका 41 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने 9 जानेवारी रोजी आत्महत्या केली. शशिकांत कातोरे असं या व्यावसायिकाचं नाव आहे.
सावकारी कर्जामुळे व्यावसायिकाने केली आत्महत्या
सावकारी कर्जाच्या ओझ्यामुळे कंटाळून शशिकांत यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला. या प्रकरणी दत्तात्रय कातोरे यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांनी एका आरोपीवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणात पुणे पोलिसांनी सुरुवातीला एका आरोपीवर गुन्हा देखील दाखल केला होता. पण गुन्ह्याच्या तपास करताना पोलिसांना अनेक गोष्टींचा उलगडा झाला. या प्रकरणात सुरेंद्रकुमार अग्रवाल, रामकुमार अग्रवाल, विशाल अग्रवाल, मुकेश झेंडे मुख्य कार्यकारी अधिकारी रवी हुडलानी यांचा हात असल्याचे उघडकीस आले.
शशिकांत यांना ‘सद्गुरू इन्फ्रा’ नावाने सुरु केलेल्या व्यवसायासाठी बँकेच्या कर्जाची गरज होती. त्याच वेळी त्यांची ओळख काळे यांच्याशी झाली. काळेंनी शशिकांतला पाच टक्के व्याजाने परतफेड करण्याच्या अटीवर पैसे दिले. शशिकांत यांनी काळे यांच्याकडून कर्ज घेतले होते. कर्ज घेण्याआधी ठरलेल्या अटीप्रमाणे ते कर्जाची परतफेड करत होते. काही महिन्यांपूर्वी शशिकांत यांनी नवीन साइट सुरू करण्यासाठी पुन्हा काळे यांच्याकडून कर्ज घेतलं. पण ही साईट सुरु झाली नाही. त्यानंतर काळेंकडून कर्जाच्या रकमेवर चक्रवाढ व्याज लावण्यात आले. पैशांसाठी काळेंनी तगादा लावायला सुरुवात केली. शशिकांत यांच्या घरी जाऊन काळेंनी त्यांना ‘पैसे परत दिले नाही तर,तुरुंगात पाठवेन’ अशी धमकी दिली. त्यामुळे कंटाळून शशिकांत कातोरे यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.
चंदननगर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 306, 504 आणि 506 नुसार सुरेंद्र अग्रवाल, बिल्डर विशाल अग्रवालवर याच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आता आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने विशाल अग्रवाल आणि त्याच्या वडिलांच्या अडचणी वाढल्याचे समोर आले आहे.