२४ जानेवारी २०२०,
श्रेयस अय्यरच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ६ विकेटनी शानदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने २०३ धावा केल्या होत्या. भारताने विजयाचे लक्ष्य ५ विकेटच्या मोबदल्यात आणि ६ चेंडू राखून पार केले. या विजयासह भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. हिटमॅन रोहित शर्मा ७ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ९९ धावांची भागिदारी केली. ही जोडी संघाला विजय मिळवून देईल असे वाटत असतानाच राहुल ५७ धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ विराट कोहली देखील ४५ धावावर माघारी परतला. या दोन विकेटमुळे भारताची अवस्था ३ बाद १२१ अशी झाली.
शिवम दुबेने काही आक्रमक शॉट खेळले. पण त्याला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. तो १३ धावा करून बाद झाला. त्यानंतर श्रेयस अय्यरने सर्व सूत्रे हाती घेतील आणि दिग्गज, अनुभवी खेळाडू सोबत नसताना संघाला एक हाती विजय मिळवून दिला. श्रेयसने १९व्या षटकातील अखेच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. त्याने २९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ५८ धावा केल्या.