दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल झाल्याचे दिसत आहे. मुंबई, पुणे यांसह सर्वच शहरात हा चित्रपट सुपरहिट झाला आहे. या चित्रपटाला स्त्रियांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतंच अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाने पहिल्याच वीकएण्डला ६.४५ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे पहिल्याच आठवड्याअखेरीस सर्वाधिक कमाई करणारा या वर्षातला सुपरहिट मराठी चित्रपट ठरला आहे. सध्या अनेक चित्रपटगृहात विविध वयोगटातील स्त्रिया हा चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहे
नुकतंच शिल्पा नवलकर यांनी एका चित्रपटगृहातील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत काही महिला या चित्रपटगृहात ‘बाईपण भारी देवा’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. तर काही महिला या चित्रपटाचा आनंद घेत पिंगा गाण्यावर थिरकत आहेत.
याबरोबरच काही महिलांनी चक्क मॉलच्या बाहेर मंगळागौर साजरी केली आहे. शिल्पा नवलकर यांनी हे सर्व व्हिडीओ एका पोस्टद्वारे शेअर केले आहे. या व्हिडीओला त्यांनी हटके कॅप्शन दिले आहे.
“ह्या उदंड आणि उत्साही प्रतिसादासाठी बाईपण भारी देवा च्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार…प्रचंड कृतज्ञ”, असे कॅप्शन शिल्पा नवलकर यांनी या व्हिडीओला दिले आहे. त्यांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.