ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 62 धावांनी पराभव करून विश्वचषकाच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शची शतकं, तसंच त्यांनी 259 धावांची दिलेली सलामी ऑस्ट्रेलियाच्या विजयात निर्णायक ठरली. विश्वचषकाच्या साखळीत ऑस्ट्रेलियाचा हा दुसरा विजय, तर पाकिस्तानचा दुसरा पराभव ठरला. ऑस्ट्रेलियानं या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी 368 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. पाकिस्ताननं त्या आव्हानाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा डाव 305 धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झॅम्पानं चार, तर पॅट कमिन्स आणि मार्कस स्टॉयनिसनं प्रत्येकी दोन फलंदाजांना माघारी धाडलं. त्याआधी, ऑस्ट्रेलियाच्या डावात डेव्हिड वॉर्नरनं 163 आणि मिचेल मार्शनं 121 धावांची खेळी उभारली.
पाकिस्तानची घसरण –
ऑस्ट्रेलियाकडून 62 धावांनी पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या संघाची गुणतालिकेत घसरण झाली आहे. पाकिस्तानच्या संघाची चौथ्या स्थानावरुन पाचव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ चौथ्या स्थानावर पोहचला आहे. पाकिस्तान संघाने चार सामन्यात दोन पराभव आणि दोन विजय झाले आहेत. ऑस्ट्रेलियाचेही चार सामन्यात चार गुण झाले आहेत.
आघाडीचे संघ कोणते ?
न्यूझीलंड आणि भारतीय संघ विश्वचषकात आतापर्यंत अजेय आहेत. या दोन्ही संघाने सलामीचे चार सामने जिंकले आहेत. रनरेट सरस असल्यामुळे न्यूझीलंडचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. तर टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यामध्ये रविवारी सामना होणार आहे. धर्मशाला येथे दोन्हीपैकी एका संघाचा विजयरथ थांबणार आहे. जिंकणारा संघ अव्वल स्थान काबिज करेल, त्याशिवाय सेमीफायनलच्या आणखी जवळ जाईल. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचे तीन सामन्यात चार गुण आहेत.