चिंचवड पोटनिवडणुकीच्या निवडणुकीत भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय झाला. त्यानंतर त्या दिवंगत आमदार आणि आपले पती लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतीस्थळी वंदन करण्यासाठी पाहोचल्या. लक्ष्मण यांच्या स्मृतीस्थळी नमस्कार करत असताना अश्विनी यांचा संयमाचा बांध सुटला आणि त्या अक्षरश: ढसाढसा रडू लागल्या. अश्विनी यांच्या पाठोपाठ त्यांची मुलगी देखील ओक्शाबोक्शी रडू लागली.
यावेळी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण हा क्षण पाहणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. त्यामुळे काही काळासाठी तिथलं वातावरण अतिशय भावूक बनलं.चिंचवडची पोटनिवडणूक ही जगताप कुटुंबासाठी सोपी नव्हती. लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर आधीच मोठं संकट कोसळलेलं होतं. त्यानंतर चिंचवड पोटनिवडणुकीच्या दरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे उमेदवारी नेमकी कुणाला दिली जाणार यावरुन तिथे चर्चा होती. अनेक चर्चांनंतर भाजपकडून तिथे लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप याना उमेदवारी देण्यात आली.
चिंचवड विधानसभेची जागा राखण्यासाठी भाजपला अतोनात प्रयत्न करावे लागले. कारण आणखी दोन ताकदवान उमेदवार या मतदारसंघात निवडणुकीच्या रणांगणात होते. ही निवडणूक अश्विनी जगताप यांच्यासाठी वैयक्तिक पातळीवर खूप आव्हानात्मक होती. अशा परिस्थितीत अश्विनी जगताप यांनी जिंकून येणं हे प्रेरणादायीच मानावं लागेल. पण लढणारी व्यक्ती कितीही डॅशिंग असली तरी माणूस आहे. त्यामुळे आपल्या पतीच्या स्मृतीस्थळी त्यांना रडू कोसळलं.
दरम्यान, विजयानंतर अश्विनी जगताप यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिलीय. “विजयांचं श्रेय मी सर्व कायर्यकर्ते, भाजप आणि ज्येष्ठ नेत्यांना देईन. सर्वासामान्य कार्यकर्ते यांच्यामुळे मी जिंकून आले. कार्यकर्ते आणि जनतेचं साहेबांवर जे प्रेम होतं तेच प्रेम त्यांनी दाखवून दिलं आहे. एकप्रकारे त्यांनी पावतीच दिलं आहे. त्यांनी विकासाला मत दिलं आहे”, असं अश्विनी जगताप म्हणाल्या.