२२ डिसेंबर २०२०,
टेलिकॉम सेक्टरमध्ये केलेल्या गुंतवणूकीनंतर आता दिग्गज टेक कंपनी गुगल भारतातील शॉर्ट व्हिडिओ सेक्टरमध्येही दबदबा निर्माण करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने एकाच दिवसात भारतातील दोन शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली आहे. गुगलने ज्या दोन अॅप्समध्ये गुंतवणूक केली त्यातील पहिलं ग्लान्सचं Roposo अॅप आणि दुसरं डेलीहंटचं Josh अॅप आहे. या दोन्ही अॅप्सचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही अॅप्समध्ये स्थानिक भाषेत कंटेट मिळतो.
रोपोसोची मालकी Glance कडे आहे, ही भारतीय युनिकॉर्न inMobi ची सहायक कंपनी आहे. या अॅपकडे 33 दशलक्ष डेली एक्टिव्ह युजर आणि 115 दशलक्ष मंथली एक्टिव्ह युजर्स आहेत. गुगलने यामध्ये 145 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणूकीसोबतच कंपनी ग्लान्स आणि रोपोसोमध्ये आपली AI क्षमता वाढवण्याची योजना आखत आहे. याशिवाय टेक्नोलॉजीची टीम मोठी करणं आणि आपल्या प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारची सर्व्हिस देण्याची कंपनीची योजना आहे.
भारतात टिकटॉक बॅन झाल्यानंतर डेलीहंटने शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म Josh ची सुरूवात केली. कंपनीचं हे अॅप 12 स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध असून Josh अॅपकडे सध्या 36 दशलक्ष डेली एक्टिव्ह युजर्स आणि 77 दशलक्ष मंथली एक्टिव्ह युजर्स आहेत. 100 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक यामध्ये झाली आहे. डेलीहंटमध्ये गुगलशिवाय माइक्रोसॉफ्ट आणि अल्फावेव यांनीही मोठी गुंतवणूक केली आहे.
दरम्यान, गुगल फॉर इंडिया इव्हेंटमध्ये गुगलने भारतात 10 अब्ज डॉलर गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती. त्यातील 4.5 अब्ज डॉलर कंपनीने रिलायन्स जिओमध्ये यापूर्वीच गुंतवले होते.