पुणे बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर मराठा समाजाच्या आंदोलकांकडून आक्रमक आंदोलन करण्यात आलं होतं. पुण्यातील नवले पुलावर संपूर्ण रस्ता रोखण्यात आला आहे. रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक टायर जाळून बंद करण्यात आली होती. यामुळं महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. नवले पुलावर मोठ्या संख्येनं मराठा आरक्षणासाठी आंदोलक जमले होते.
पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांची समजूत काढून तब्बल दोन ते अडीच तासांनतर वाहतूक सुरु करण्यात यश मिळवलं आहे. यावेळी मराठा आरक्षण आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीला काही झाल्यास आंदोलन आक्रमकपणे करु असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
डी.सी.पी. सोहेल शर्मा यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.मुंबई बंगळुरु हा महामार्ग देशातील महत्त्वाचा मार्ग आहे. पहिल्या अर्धातासात साताऱ्याकडील वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. त्याशिवाय सर्व्हिस रोडवरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती सोहेल शर्मा यांनी दिली आहे. पुरेसं पोलीस दल घटनास्थळी असून आंदोलकांशी चर्चा करुन वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे, असं सोहेल शर्मा म्हणाले.
तब्बल अडीच तासानंतर नवले ब्रिजावरील वाहतूक सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलकांच्यावतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. टायर जाळून जाळपोळ केल्याने तब्बल सहा किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा,असं मराठा आंदोलकांनी म्हटलं. नवले पुलाच्या परिसारातील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी किमान दोन तास लागतील, अशी माहिती आहे.