मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढली. तसेच पीडित महिलांना रस्त्याच्या बाजुला असणाऱ्या शेतात नेऊन त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर या घटनेबाबत सेलिब्रिटी संताप व्यक्त करत दोषींवर कारवाई व्हावी, अशी मागणी करत आहेत. रेणुका शहाणे, उर्फी जावेद, उर्मिला मातोंडकर, रिचा चड्ढा यांनी ट्वीट करून या घटनेबाबत रोष व्यक्त केला आहे.
“मणिपूरमधील अत्याचार रोखणारे कोणी नाही का? दोन महिलांचा तो व्हिडीओ पाहून तुमचा थरकाप उडाला नसेल, तर स्वत:ला माणूस म्हणणं योग्य आहे का? भारतीय म्हणणं तर सोडून द्या!” अशी संतप्त प्रतिक्रिया रेणुका शहाणे यांनी दिली आहे.
“मणिपूरमधील व्हिडीओ पाहून धक्का बसलाय. मी घाबरलेय, हादरले आहे. हे मे महिन्यात घडलं आणि त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. सत्तेच्या नशेत बसलेले आणि अशा घटनांवरही गप्प बसणारे सेलिब्रिटी पाहून लाज वाटते. प्रिय भारतीयांनो आम्ही इथे कधी पोहोचलो?” असं उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं आहे.
“लज्जास्पद! भयंकर! नियम नसलेले!” अशी प्रतिक्रिया रिचा चड्ढाने दिली आहे.
दरम्यान, ‘इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरम’ (ITLF) ने दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरची राजधानी इंफाळपासून ३५ किमी अंतरावर असलेल्या कांगपोकपी जिल्ह्यात ४ मे रोजी ही घटना घडली होती. याबाबत कांगपोकपी येथील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्रकरणी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंह यांनी पोलिसांना तातडीने तपास करण्याचे आदेश दिले आहेत.