७ नोव्हेंबर २०२०
रात्री ध्वनिक्षेपकाच्या मर्यादेमुळे आधीच अडचणीत सापडलेला लोकनाटय़ तमाशा यंदा ऐन हंगामातच करोनाच्या टाळेबंदीमुळे बंद पडल्याने मरणासन्नावस्थेत पोहोचला आहे. मात्र, शिथिलतेच्या मालिकेत आता नाटक-सिनेमांसाठी परवानगी देण्यात आल्याच्या पाठोपाठ दिवाळीनंतर राज्यात तंबूतील तमाशाची ढोलकीही खणखणणार आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती अखिल भारतीय तमाशा परिषदेच्या वतीने देण्यात आली.
महाराष्ट्राच्या अस्सल ग्रामीण मातीतील कला म्हणून ओळख असलेल्या लोकनाटय़ तमाशाला रात्री वेळेच्या मर्यादेमुळे आधीच घरघर लागली आहे. त्याही स्थितीत अनेक फड मालकांकडून ही कला टिकवून ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न केले जात आहेत. वर्षभरामध्ये दसरा ते बौद्ध पौर्णिमा हा तमाशाचा मूळ हंगाम असतो. गुढीपाडव्यापर्यंत गावोगावी तंबूत तिकिटे लावून तमाशा सादर केला जातो. प्रामुख्याने सावकाराकडून कर्ज काढून या कालावधीत खर्च भागविला जातो. गुढीपाडवा ते बौद्ध पौर्णिमा हाच यात्रा-जत्रांचा कालावधी वर्षभराच्या उत्पन्नासाठी महत्त्वाचा असतो. याच कालावधीमध्ये वर्षभरातील कर्जाची परतफेड, साहित्याचे भाडे, कलावंतांचे मानधन आदी चुकते करण्याचे नियोजन असते. मात्र, यंदा ऐन कमाईच्या कालावधीतच करोनाचा विळखा घट्ट झाला आणि टाळेबंदीनंतर यात्रा-जत्रांबरोबरच तमाशाही ठप्प झाला आहे.
राज्यात तमाशाचे १३० छोटे-मोठे फड आहेत. ३२ मोठय़ा फडांसह काही जण अद्यापही तग धरून आहेत. बंदच्या कालावधीत हातातून गेलेल्या हंगामासाठी पूर्वी काढलेल्या कर्जाचा मोठा बोजा फड मालकांवर आहे. त्यामुळे निदान दिवाळीनंतर तरी गावोगावी तंबू उभारून तमाशा सादर करण्याची आणि त्यातून कर्जाची परतफेड करण्याचे फड मालकांचे नियोजन आहे. या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून शासकीय पातळीवर प्रयत्न करण्यात येत होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. त्यात दिवाळीनंतर दहा दिवसांनी तमाशाला परवानगीचे आश्वासन देण्यात आल्याचे अखिल भारतीय तमाशा परिषदेचे अध्यक्ष आविष्कार मुळे यांनी सांगितले. फड मालकांनी याबाबत समाधान व्यक्त केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.