Tuesday, April 21, 2026
Homeताजी बातमीनियुक्तीनंतर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी अ‍ॅक्शनमध्ये; विभागांची पाहणी, शिस्त व स्वच्छतेच्या सूचना

नियुक्तीनंतर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी अ‍ॅक्शनमध्ये; विभागांची पाहणी, शिस्त व स्वच्छतेच्या सूचना

 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील विविध विभागांना भेट देत कामकाजाची सखोल पाहणी केली. या पाहणीदरम्यान प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या.

या पाहणी दरम्यान त्यांचे समवेत उप संचालक किशोर गोखले,सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता सुनील भागवानी, बापू गायकवाड, अनिल भालसाखळे, उप आयुक्त राजेश आगळे, सचिन पवार, चेतना केरुरे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी प्रत्येक विभागातील दैनंदिन कामकाज, प्रलंबित विषय, नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारी व त्यावर करण्यात येणारी कार्यवाही याबाबत सविस्तर माहिती घेतली. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधत कामातील अडचणी, आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक सुविधा यांचा आढावा घेतला. प्रशासनातील कामकाज अधिक सुटसुटीत आणि गतिमान करण्यासाठी विभागीय पातळीवर समन्वय वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी त्यांनी विभागांची अंतर्गत रचना, बैठक व्यवस्था आणि कार्यालयीन परिसराची स्वच्छता यावर विशेष भर दिला. कार्यालयीन जागा अधिक सुव्यवस्थित, स्वच्छ आणि कामकाजास पूरक राहील, यासाठी जुन्या फाईल्स व अनावश्यक कागदपत्रांचे गट्ठे तत्काळ हटविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. डिजिटल पद्धतींचा अधिकाधिक वापर करून कागदविरहित कामकाज वाढविण्यावर भर दिला. 

कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक आणि प्रेरणादायी कार्यपरिसर निर्माण करणे तसेच नागरिकांना कार्यालयात येताना सुलभ आणि विश्वासार्ह सेवा अनुभव मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. याशिवाय कार्यालयीन वातावरण सुधारल्यास कामकाजाची गुणवत्ता वाढते आणि त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या समाधानावर होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिस्तबद्ध आणि वेळेवर कामकाज होण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट निर्देश दिले. यासोबतच, पुढील पंधरा दिवसांनी पुन्हा एकदा सर्व विभागांची पाहणी करून दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी झाल्याबाबत खातरजमा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पाहणीनंतर महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांची देखील लवकरच पाहणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments