Friday, September 11, 2026
Homeताजी बातमीअधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन सकारात्मक - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर प्रशासन सकारात्मक – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

कर्मचारी महासंघाच्या विविध मागण्यांबाबत आढावा बैठक, पदोन्नती, सेवा ज्येष्ठता, जुनी पेन्शनसह विविध विषयांवर चर्चा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवा विषयक प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून, विविध मागण्यांची टप्प्याटप्प्याने पूर्तता करण्यासाठी संबंधित विभागांनी कार्यवाही गतिमान करावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कामगार कल्याण विभागाच्या वतीने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.

बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, उपायुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, सहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे,  मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांच्यासह कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची पदोन्नती, सेवा ज्येष्ठता, जुनी पेन्शन योजना, सेवा प्रवेश नियम, आकृतीबंध, धन्वंतरी योजना, आश्वासित प्रगती योजना, आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत १०, २० व ३० वर्षांचा लाभ, आगाऊ वेतनवाढ, घरबांधणी कर्ज, वाहन कर्ज व संगणक कर्ज यांसह विविध मागण्यांबाबतही बैठकीत चर्चा झाली.

तसेच बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या बोनस बाबतचा करार लवकर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “कर्मचाऱ्यांचे सेवा विषयक प्रश्न नियमांच्या चौकटीत आणि वेळेत निकाली काढण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही केली जात आहे. प्रत्येक मागणीचा वस्तुनिष्ठ विचार करून ज्या बाबींवर निर्णय घेणे शक्य आहे, त्या प्रकरणांमध्ये विलंब होणार नाही. तसेच संबंधित विभागांनी आवश्यक प्रस्ताव व कार्यवाही तातडीने पूर्ण करून कर्मचारी हिताचे प्रश्न मार्गी लावावेत,” अशा सूचना देखील आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिल्या.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments