आदित्य राजकारणात व्यस्त असल्याचा फायदा घेत युवासेनेचे काही पदाधिकारी आपल्याला डावलत आहेत, आरोप करत राहुल कनाल यांनी ठाकरे गटाला रामराम केला आहे.
माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जाणारे राहुल कनाल यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला जय महाराष्ट्र केला आहे. कनाल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी आयकर विभागाच्या पथकाने राहुल कनाल यांच्या घरी छापा मारला होता, पण त्यात काही निष्पन्न झालं नव्हतं. अशा परिस्थितीतही राहुल कनाल यांनी आदित्य ठाकरेंची साथ सोडली नव्हती. मात्र आदित्य राजकारणात व्यस्त असल्याचा फायदा घेत काही युवासेनेचे पदाधिकारी आपल्याला डावलत असल्याचा आरोप करत कनाल यांनी ठाकरेंना रामराम केला आहे.
राज्याच्या उत्तुंग विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे राहुल कनाल यांनी म्हटले आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंच्या युवासेना कोअर कमिटीतील पूर्वेश प्रताप सरनाईक, समाधान सदा सरवणकर, योगेश रामदास कदम, सिद्धेश कदम, अमेय घोले यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. प्रवेशावेळी सर्वांचा रोष हा युवासेनेच्या काही पदाधिकाऱ्यांवर होता. आता राहुल कनाल यांना देखील डावलण्यात आल्याचा दावा केला जात आहे. स्वाभिमानासाठी राहुल कनाल यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केल्याची चर्चा आहे.
कोण आहेत राहुल कनाल?
आदित्य ठाकरेंची कोअर कमिटी ही युवासेनेची ताकद मानली जाते. या कोअर कमिटीतील आणि आदित्य ठाकरे यांची एकदम जवळची विश्वासू व्यक्ती म्हणून राहुल कनाल यांची ओळख होती. ते मुंबई महापालिकेत स्वीकृत सदस्य होते. युवा सेनेचे सक्रिय पदाधिकारी मानले जात. महाविकास आघाडीची सत्ता असताना शिर्डी देवस्थान समितीवर ते सदस्य राहिले आहेत.
विराट कोहली आणि सलमान खान यांच्यासारख्या सेलिब्रिटींसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. दिशा सॅलियन आणि सुशांतसिंग राजपूत प्रकरणाशी राहुल कनाल यांचे संबंध जोडण्यात आले होते. पण त्यातही पुढे फार काही झालं नाही. याच प्रकरणासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सॅलियन प्रकरणात काही पुरावे तपासले जात असल्याची माहिती देखील दिली आहे. दिशा सॅलियन आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणात वारंवार युवा सेनेच्या नेत्यांवर आरोप करण्यात आले. त्यावेळी राहुल कनाल यांच्यावर देखील आरोप करण्यात आले होते. मात्र आता राहुल कनाल स्वतः नाराज असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत.
राहुल कनाल यांना समजावण्याचा प्रयत्न ठाकरे कुटुंबियांकडून करण्यात येत होता, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. सध्याच्या राजकीय वातावरणात पक्षाला राहुल कनाल सारख्या युवा पदाधिकाऱ्यांची गरज असल्याचं बोललं जात आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश चालू असताना जुने सहकारी मात्र दुरावले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत युवा सेनेची जबाबदारी असलेले आदित्य ठाकरे कोअर कमिटीत कोणते बदल करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे