पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील शाळांमधील पायाभूत सुविधा, समस्या व त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी गुरुवार, १८ एप्रिल रोजी शहरातील विविध शाळांना भेट देऊन शाळा प्रशासन व अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. यावेळी सहाय्यक आयुक्त, विजयकुमार थोरात, प्रशासन अधिकारी संगीता घोडेकर – बांगर, पर्यवेक्षक तसेच संबंधित अधिकारी वर्ग उपस्थित होता.
शहरातील वसंतदादा पाटील विद्यामंदिर, आकुर्डी (मराठी माध्यम शाळा), फकीरभाई पानसरे उर्दू माध्यम शाळा, निगडी २/२ कन्या शाळा, रुपीनगर उर्दू माध्यम शाळा, तळवडे प्राथमिक शाळा क्र. ९८ या शाळांना अतिरिक्त आयुक्त यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शाळेतील भौतिक सुविधा व त्यांची डागडुजी, शाळांमधील वर्गातील जुने, नादुरूस्त बेंच शक्य असल्यास आय. टी. आय मधील विद्यार्थ्यांकडून दुरुस्त करून घेणे, शालेय परिसरात स्वच्छता राखण्यासाठी सफाई कर्मचा-यांना, ठेकेदार किंवा संबंधितांना सूचना करणे, एम.आय.एस डॅशबोर्ड मध्ये सर्व विद्यार्थ्यांची माहिती वेळोवेळी अद्ययावत ठेवणे, शालेय पोषण आहारामध्ये विहित केल्यानुसार योग्य आहार मिळत असल्याबाबतची वेळोवेळी खात्री करणे, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देता येईल याबाबत प्रयत्न करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या.
शाळांमध्ये दिवसेंदिवस चांगल्या सुधारणा करण्यासाठी महापालिका सदैव प्रयत्नशील…
महापालिकेच्या शाळांमध्ये सुधारणा करणे व शाळांच्या सध्याच्या परिस्थितीबाबत माहिती घेण्यासाठी आम्ही रोज शहरातील विविध शाळांना भेटी देत आहोत. महापालिकेच्या शाळांमध्ये दिवसेंदिवस चांगल्या सुधारणा करणे व शाळांमधील सोयी सुविधांबाबत महापालिका कायम प्रयत्नशील आहे. आगामी काळात महापालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याच समस्यांना सामोरे जावे लागणार नाही याची खबरदारी सुद्धा महापालिका प्रशासन घेत आहे.- प्रदीप जांभळे – पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
शाळांमध्ये उत्तम भौतिक सुविधा देण्यावर विभागाचा भर…
महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विविध सोयी सुविधा देण्यासाठी शिक्षण विभाग कायम प्रयत्नशील असतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळांमध्ये भौतिक सोयी सुविधा उत्तम असणे गरजेचे असून त्या देण्यासाठी विभागाने भर दिलेला आहे. – विजयकुमार थोरात, सहाय्यक आयुक्त, शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका