शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणे ही सामुहिक जबाबदारी असून कचऱ्याचे योग्य विलगीकरण करून त्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे. शहरामध्ये घरगुती कचऱ्याचे ८५ ते ९० टक्के विलगीकरण होत असून औद्योगिक कंपन्यांनी त्यांच्या आवारात निर्माण होणा-या अघातक कचऱ्याचे ओला व सुका असे विलगीकरण करून दिल्यास तो कचरा महापालिकेच्या वतीने संकलित करण्यात येईल. औद्योगिक क्षेत्रातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी शहरातील सर्व औद्योगिक कंपन्यांनी समन्वयाने काम करून औद्योगिकनगरीला देशातील सर्वात स्वच्छ व सुंदर शहर बनविण्यासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले.
महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयामध्ये शहरातील औद्योगिक क्षेत्रातील घनकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, लघुउद्योजक संघटनांचे पदाधिकारी तसेच एमआयडीसीमधील उद्योजक यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय बैठक पार पडली. त्यावेळी उपस्थित औद्योगिक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना बोलत होते.
या बैठकीस आरोग्य विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर, क क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी किरण हसबनीस, मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सचे दिपक करंदीकर, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदिप बेलसरे, उपाध्यक्ष विनोद नाणेकर, सचिव जयंत कड, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अभय भोर, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, सहायक आरोग्याधिकारी तानाजी दाते यांच्यासह महापालिका कर्मचारी तसेच शहरातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये सहभाग घेतला असून त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कचऱ्यापासून वीजनिर्मिती (वेस्ट टू एनर्जी) हा उपक्रम महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य विलगीकरण करून त्याचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक असून त्या अनुषंगाने महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. औद्योगिक क्षेत्रातील कचऱ्याचे योग्य विलगीकरण होत नसून काही कंपन्या त्यांच्या आवारात निर्माण होणारा कचरा रस्त्यावर किंवा इतरत्र टाकतात. त्यामुळे कचरा संकलन करण्यास अनेक अडचणी येतात. तसेच मिश्र कचरा जाळल्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने आपली भूमिका आणि जबाबदारी समजून घेऊन त्यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
औद्योगिक कंपन्यांनी त्यांच्या आवारात निर्माण होणा-या अघातक कचऱ्याचे योग्य विलगीकरण करून ठेवल्यास तो कचरा संकलित करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून औद्योगिक कंपन्यांनी समन्वयाने काम करून घातक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शहरातील कंपन्यांनी एकत्रित येऊन योग्य समन्वय साधून घातक कचऱ्याचे एकत्रित संकलन केल्यास दळणवळणासाठी ते सोयीचे ठरेल, असे देखील अतिरिक्त आयुक्त वाघ यांनी बैठकीत नमूद केले. एमआयडीसी भागातच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केंद्र उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे. यासाठी औद्योगिक कंपन्यांचे महापालिकेला सहकार्य अपेक्षित असल्याचे अतिरिक्त आयुक्त वाघ यांनी सांगितले.
उपआयुक्त अजय चारठाणकर म्हणाले, कचरा विलगीकरण न केल्यामुळे पर्यावरणावर त्याचा घातक परिणाम होतो. परिणामी, त्याचा मानव तसेच प्राण्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. घरगुती कचरा विलगीकरणासाठी नागरिकांचा सकारात्मक आणि चांगला प्रतिसाद मिळत असून औद्योगिक कंपन्यांकडून देखील सकारात्मक प्रतिसाद अपेक्षित आहे.
क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरामध्ये औद्योगिक आस्थापना अधिक प्रमाणात आहेत. यामुळे शहरातील तसेच शहराबाहेरील बहुसंख्य नागरिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. ही बाब समाधानकारक आहे मात्र औद्योगिक आस्थापनांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होणे अपेक्षित आहे. कचऱ्याचे योग्य विलगीकरण करून ठेवल्यास कचरा संकलन करण्यासाठी महापालिकेला निर्माण होणाऱ्या अडचणी कमी होतील, असे अण्णा बोदडे यांनी सांगितले.
सहशहर अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात औद्योगिक कंपन्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. परंतु, औद्योगिक क्षेत्रात निर्माण होणाऱ्या कचऱ्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी औद्योगिक आस्थापनांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.अघातक कचऱ्याचे ओला व सुका कचरा असे विलगीकरण करून पालिकेला देण्याचे आश्वासन बैठकीस उपस्थित औद्योगिक आस्थापनांच्या प्रतिनिधींनी यावेळी दिले.