एकविसाव्या शतकात डिजिटल माध्यमांचा प्रसार वेगाने होत असताना नव्या पिढीत वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी ‘पुणे पुस्तक महोत्सवा’सारखे उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, धीरज घाटे आदी उपस्थित होते.
श्री. मुनगंटीवार यांनी पुणे पुस्तक महोत्सव हा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगून या भव्य आयोजनाबद्दल कौतुक केले. त्यांनी श्री.पांडे यांच्याकडून महोत्सवात झालेल्या विश्वविक्रमाची माहिती घेतली.
विविध विषयांचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी पुस्तके मार्गदर्शक ठरतात आणि मुलांना पुस्तकापर्यंत पोहोचविण्यासाठी पुस्तक महोत्सवासारखे आयोजन महत्वाचे आहे, असे नमूद करून त्यांनी संयोजनात सहभागी व्यक्ती आणि संस्थांचे अभिनंदन केले.