मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी खोपोलीतील इंडिया आघाडीचे कार्यकर्ते आता मैदानात उतरले आहेत. “अरे कोण म्हणतंय येणार नायं, अरे आल्या शशिवाय राहणार नाय” अशा घोषणांनी खोपोलीतील परिसर दणाणून गेला होता. भर उन्हात कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
खोपोलीतील भाऊ कुंभार चाळ शास्त्रीनगर येथील गणेश मंदिरातून महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा नारळ फोडून प्रचार सुरुवात केली. कॉंग्रेसचे जेष्ठ नेते उल्लासराव देशमुख, शेतकरी कामगार पक्षाचे कैलास गायकवाड, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरद पवार) गटाचे शहराध्यक्ष अतुल पाटील, महिला शहरअध्यक्षा सुवर्ण मोरे, कॉग्रेस महिला अध्यक्षा रेखाताई जाधव, तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रचारास मोठ्या संख्येने उपस्थित होते. शास्तीनगर, क्रांतीनगर आणि काटरंग परिसरात हजारोंच्या संखेने प्रचार रॅलीला सुरुवात झाली.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे म्हणाले की, “प्रचाराचा झंझावात जोरात सुरु आहे. उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना खालापूर तालुक्यातून चांगल्या प्रकारे लीड देवू” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरद पवार) गटाच्या महिला शहराध्यक्षा सुवर्णा मोरे म्हणाल्या की, “आताच्या सरकारला जनता त्रस्त झाली आहे. वाढती महागाई झालेली आहे. पेट्रोल, गॅस सिलेंडरचे दर तेराशे रुपयांवर गेला आहे. या महागाईला त्रस्त होवून महिला आता रस्त्यावर उतरलेल्या आहेत. त्यामुळे मावळ लोकसभेत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा विजय निश्चित आहे”.
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते रवी रोकडे म्हणाले की, “भारतीय संविधान वाचवण्याचे काम इंडिया आघाडी करणार आहे. या सरकारला कंटाळून देशातील नागरिक, कार्यकर्ता आज पेटून उठला आहे. त्यामुळे मावळ लोकसभा मतदार संघात बदल घडणार असून उमेदवार संजोग वाघेरे पाटील प्रचंड मतांनी निवडून येतील त्यासाठी आम्ही निर्धार केला आहे”.