अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या जामीन अर्जाला पुन्हा विरोध केला आहे. दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्याशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, असे ईडीने न्यायालयात म्हटले आहे.
नवाब मलिक यांना फेब्रुवारीमध्ये मनी लाँडरिंग प्रकरणी अटक करण्यात आली होती. तसेच ईडीकडून एप्रिल २०२२ मध्ये त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर मलिक यांनी विशेष पीएमएलए न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता.
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, मलिक, त्याचा भाऊ अस्लम, हसीना पारकर आणि १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी सरदार खान यांच्यात कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंड संदर्भात अनेक बैठका झाल्या होत्या. ही जागा खरेदी करण्यासाठी हसीना पारकरला ५५ लाख रुपये बेकायदेशीरपणे दिले गेले. या बेकायदेशीर व्यवहारात नवाब मलिक यांचा सक्रीय सहभाग होता, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.
नवाब मलिक गेल्या सहा आठवड्यापासून वैद्यकीय उपचारासाठी तुरुंगाबाहेर आहेत. हे लवपण्यासाठी जामीन अर्जाचे षडयंत्र रचल्या जात आहेत. त्यांना आता पुढील उचाराची गरज नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवावे, असेही ईडीकडून सांगण्यात आले आहे.