मित्रासोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणीचा पाठलाग करून विनयभंग करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांनी हा निकाल दिला.
स्वप्नील भोयर (वय ३६ वर्ष, रा. प्लँटिन सोसायटी, चंद्रमौळी गार्डन जवळ, वाकड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी हडपसर परिसरातील ३४ वर्षीय महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
फिर्यादी व तिचा मित्र चांदणी चौकातील कॉफी शॉपमध्ये कॉफी पिण्यासाठी गेले होते. तेव्हा आरोपी फिर्यादीकडे टक लावून बघत होता. ते तिथून कारमधून निघून गेले. त्यानंतर आरोपीने दुचाकीवर त्यांचा पाठलाग केला. त्यांनी कार थांबवून त्याला अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने टिश्यू पेपरवर अश्लील संदेश लिहून तो कागद फिर्यादीकडे भिरकवला, असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
गुन्हा सिद्ध करण्यासाठी सहा साक्षीदार तपासण्यात आले. सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. ॲड. जाधव यांनी केलेला युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.