Saturday, March 2, 2024
Homeगुन्हेगारीविनयभंगातील आरोपीला अवघ्या ७२ तासांत न्यायालयाने सुनावली शिक्षा, ३६ तासांतच केली होती...

विनयभंगातील आरोपीला अवघ्या ७२ तासांत न्यायालयाने सुनावली शिक्षा, ३६ तासांतच केली होती अटक

एकीकडे न्यायालयामध्ये एखाद्या घटनेचा निकाल लागून न्याय मिळवण्यासाठी वर्षोनुवर्षे लागत असताना पुण्यात मात्र विनयभंगातील आरोपीला अवघ्या ७२ तासांत शिवाजी नगर न्यायालयाने १८ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे. समीर जाधव असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हिंजवडीत समीर जाधवने एका महिलेचा घरी जाऊन तिच्या मुलांसमोर अश्लील कृत्य करत विनयभंग केला होता. या प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. आरोपी विरोधात सबळ पुरावे सादर करून गुन्हा सिद्ध करण्यात आला. अशी माहिती पोलीस अधिकारी मुदळ यांनी दिली. न्यायालयाचे कामकाज श्रद्धा जी डोलारे यांनी पाहिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता पिडीत महिला घरी असताना आरोपी समीर जाधव याने मुलासमोर त्या महिलेचा विनयभंग केला होता. ओळखीचा गैरफायदा घेऊन महिलेच्या घरात थेट घुसून त्याने विनयभंग केला होता. दरम्यान, पीडित महिलेने हिंजवडी पोलिसात तक्रार दिल्यानंतर अवघ्या ३६ तासांत आरोपी समीरला पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ यांनी बेड्या ठोकल्या.

यानंतर शिवाजी नगर न्यायालयात आरोपपत्र दाखल करत सरकारी वकील विजयसिंह जाधव यांच्यामार्फत सबळ पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले. दोन्हीकडील युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांनी आरोपी समीर जाधवला कलम ३५४ अन्वये सहा महिने, कलम ४५२ अन्वये सहा महिने, कलम ५०६ अन्वये सहा महिने अशी सक्त मजुरीसह नऊ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. पहिल्या ३६ तासांत हिंजवडी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या तर पुढील ३६ तासांत न्यायलायने निकाल देत आरोपीला शिक्षा सुनावली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मुदळ यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments