भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चौथ्या टप्प्यात येत असून या निवडणूकीची विहित नमूना १ची सूचना प्रसिध्द करण्यात येत असल्याची माहिती मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली आहे.
निवडणूक सूचनेबद्दल माहिती देताना दीपक सिंगला म्हणाले, मावळ लोकसभा मतदार संघातून एका सदस्यासाठी लोकसभेसाठी निवडणूक घेतली जात आहे. दि.१८ एप्रिल रोजी या निवडणूकीची सुचना प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्या दिवसापासून नामनिर्देशन पत्रे स्विकारण्यात येणार आहे. उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाला निवडणूक निर्णय अधिकारी किंवा मावळ –मुळशीचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी यांच्याकडे गुरुवार दि. २५ एप्रिल २०२४ पर्यंत सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त कोणत्याही दिवशी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्रे दाखल करता येतील. सातवा मजला, बी विंग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आकुर्डी, पुणे येथे मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय स्थापित करण्यात आले आहे. या ठिकाणी नामनिर्देशन पत्रे मिळू देखील शकतील. दि.२५ एप्रिल २०२४ रोजी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याची अंतिम तारीख असेल, असे दीपक सिंगला यांनी सांगितले.
७ वा मजला, बी विंग, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आकुर्डी, पुणे येथे मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात शुक्रवार दि.२६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता नामनिर्देशन पत्रांची छानणी केली जाईल. उमेदवारी मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला किंवा त्याच्या कोणत्याही सूचकाला किंवा उमेदवाराने लेखी प्राधिकार दिलेल्या निवडणूक प्रतिनिधीला निवडणूक निर्णय अधिकारी अथवा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे मावळ लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात दि.२९ एप्रिल २०२४ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत देता येईल. निवडणूक लढविली गेल्यास सोमवार दि.१३ मे २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल, असेही सिंगला यावेळी म्हणाले.