Tuesday, February 27, 2024
Homeमहाराष्ट्र'एंडलेस बॉर्डर्स' या अब्बास अमिनी यांच्या चित्रपटाने इफ्फी 54 मध्ये पटकावला सर्वोत्कृष्ट...

‘एंडलेस बॉर्डर्स’ या अब्बास अमिनी यांच्या चित्रपटाने इफ्फी 54 मध्ये पटकावला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर पुरस्कार..

चित्रपट क्षेत्रातील विविध प्रकारच्या गुणवत्तेचा सन्मान करत  54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  (इफ्फी) आज प्रतिष्ठेचा सुवर्ण मयूर पुरस्कार जाहीर करण्यात आला. गोव्यातील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे  आज शानदार सांगता सोहळ्यात  चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश असलेल्या आंतरराष्ट्रीय ज्युरींनी पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली.  महोत्सवात प्रतिष्ठेच्या सुवर्ण मयूर पुरस्काराच्या स्पर्धेत 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय असे  15 सर्वोत्कृष्ट  चित्रपट होते. या पुरस्काराचे स्वरूप 40 लाख रुपये, प्रमाणपत्र आणि सुवर्ण मयूर पदक असे आहे.
 
1. ‘एंडलेस बॉर्डर्स’ या अब्बास अमिनी यांच्या  चित्रपटाने 54 व्या इफ्फी मध्ये पटकावला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर पुरस्कार

अफगाणिस्तानात तालिबानच्या उदयामुळे निर्माण झालेल्या  अशांततेच्या पार्श्वभूमीवर इराणी शिक्षकाचे  कठीण जीवन भावपूर्णरीत्या या चित्रपटात मांडण्यात आले आहे.   हा चित्रपट पूर्वग्रह, नैतिक दुविधा आणि निषिद्ध प्रेमातील गुंतागुंत यातले नाट्य अत्यंत सूक्ष्मतेने दर्शवतो.  दिग्दर्शक अब्बास अमिनी यांच्या धाडसी कथनाची प्रशंसा करून परीक्षकांनी,   भौतिक  आणि भावनिक सीमा ओलांडण्याच्या   चित्रपटाच्या क्षमतेची प्रशंसा केली.

परीक्षक म्हणाले , “भौगोलिक सीमा कितीही गुंतागुंतीची असली तरी  तुम्ही स्वतःवर लादलेल्या भावनिक आणि नैतिक सीमांपेक्षा अधिक गुंतागुंतीचे काहीही असू शकत नाही, हे हा चित्रपट दर्शवतो. शेवटी  चित्रपट महोत्सव हे सर्व सीमा ओलांडण्यासंदर्भात असतात आणि या चित्रपटाच्या बाबतीत, दिग्दर्शकाने स्वतःच्या स्वातंत्र्याच्या किंमतीवर राजकीय सीमा ओलांडल्या आहेत.”

अफगाण सीमेजवळ असलेल्या इराणमधल्या  एका गरीब गावात अहमद या निर्वासित इराणी शिक्षकाची कथा या चित्रपटात आहे.चित्रपटात  अफगाणिस्तानात तालिबानच्या उदयाने वांशिक  आणि जमातीय युद्धांची आग पुन्हा भडकली  आहे. तालिबानमुळे तत्काळ धोक्यात आलेले  हजारा अफगाण समुदायातील लोक  बेकायदेशीरपणे इराणमध्ये प्रवेश करतात. अहमदची अफगाणिस्तानातील एका हजारा कुटुंबाशी ओळख होते तेव्हा त्याला या प्रदेशातील पूर्वग्रह आणि कट्टरता यांचा खरा चेहरा दिसतो. निषिद्ध प्रेम त्याला  त्याच्या आयुष्यातील  प्रेम आणि शौर्याचा अभाव शोधायला भाग पडते. 

2. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून  बल्गेरियन दिग्दर्शक स्टीफन कोमांडारेव्ह ‘ब्लागाज लेसन्स’या  चित्रपटासाठी रौप्य मयूर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  

फसवणुकीच्या प्रसंगात नैतिकतेशी तडजोडी संदर्भात खोलवर शोध या चित्रपटात मांडण्यात आला आहे. चित्रपटाच्या केंद्रस्थानी ब्लागा ही पतीचे निधन झालेली स्त्री  आहे,  टेलिफोन घोटाळेबाजांना  बळी पडल्यानंतर तिची नैतिकता डळमळीत होऊ लागते. कम्युनिस्टोत्तर बल्गेरियातील आजच्या ज्येष्ठ नागरिकांच्या असुरक्षित जीवनावर हा चित्रपट  प्रकाश टाकतो.

आपले हेतू साध्य करण्याचा निर्णय घेणाऱ्या आणि त्यासाठी आपल्या मूल्यांशी तडजोड करू लागणाऱ्या  एका स्त्रीच्या व्यक्तिरेखेद्वारे, स्टीफन  कोमांडारेव्ह एक खोलवर भिडणारा  आणि धक्कादायक धडा या चित्रपटातून देतो.  महान कलाकार एली स्कोर्चेवाहा यांनी चित्रपटात अप्रतिम भूमिका   साकारली  आहे. या पुरस्काराचे स्वरूप 15 लाख रुपये, प्रमाणपत्र आणि रौप्य मयूर पदक असे  आहे.

3. एंडलेस बॉर्डर्स साठी पौरिया रहीमी सॅमला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा (पुरुष) सिल्व्हर पिकॉक (रजत मयूर) पुरस्कार.

अब्बास अमिनी दिग्दर्शित एंडलेस बॉर्डर्स या पर्शियन चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेता पौरिया रहीमी सॅम यांची सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी एकमताने म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘सकस अभिनय आणि चित्रीकरणाच्या आव्हानात्मक परिस्थितीत सहकलाकार मुले आणि प्रौढांशी संवाद साधल्याबद्दल’ ज्युरीने (निवड समिती) या अभिनेत्याची निवड केली आहे. वांशिक तणाव आणि द्वेष यावर मात करत मार्गक्रमण करणाऱ्या अहमद या निर्वासित इराणी शिक्षकाच्या भूमिकेत त्याने केलेल्या कामगिरीने जूरी सदस्यांना प्रभावित केले. तसेच चित्रीकरणाच्या आव्हानात्मक परिस्थितीशी जुळवून घेत केलेल्या प्रामाणिक कामगिरीची ज्युरी सदस्यांनी प्रशंसा केली.

अफगाण सीमेजवळ असलेल्या इराणच्या एका गरीब खेड्यातील निर्वासित इराणी शिक्षक, अहमदच्या अंतहीन संघर्षमय प्रवासाची ही कथा आहे. अफगाणिस्तानात तालिबानच्या उदयाने वांशिक आणि जमातींमधील युद्धाची आग पुन्हा भडकली आहे.

तालिबानचा सर्वात जास्त धोका असलेले हजारा अफगाण लोक बेकायदेशीरपणे इराणमध्ये प्रवेश करतात. अहमदची अफगाणिस्तानातील हजारा कुटुंबाशी ओळख होते, तेव्हा त्याला या प्रदेशातील पूर्वग्रह आणि कट्टरतावाद याचे खरे स्वरूप समजते. निषिद्ध प्रेम त्याला कृती करायला लावते आणि आपल्या जीवनात ज्याचा अभाव आहे, ते प्रेम आणि शौर्याचा शोध घ्यायला शिकवते.

इफ्फी मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सुमारे 15 चित्रपटांमधील पुरुष कलाकारांपैकी आंतरराष्ट्रीय ज्युरीने निवडलेल्या सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेत्याला हा पुरस्कार प्रदान केला जातो. 10 लाख रुपये, प्रमाणपत्र आणि सिल्व्हर पीकॉक पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
4. पार्टी ऑफ फूल्स साठी मेलानिया थियरीला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा (महिला) सिल्व्हर पिकॉक पुरस्कार

फ्रेंच अभिनेत्री, मेलानी थियरी हिला पार्टी ऑफ फूल्ससाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचा सिल्व्हर पीकॉक पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर करताना ज्युरी म्हणाले की, हा प्रस्कार “अशा अभिनेत्रीला जाहीर झाला आहे, जी आपल्या अभिनयाच्या सूक्ष्म छटांमधून चित्रपटातील तिच्या भूमिकेमधील आशा आणि निराशेच्या हिंदोळ्यांचा वेडा प्रवास आपल्याला घडवते.    

तिच्या भूमिकेच्या गोंधळात टाकणाऱ्या प्रवासामधील आशा आणि निराशेची गुंतागुत प्रेक्षकांच्या मनावर खोलवर परिणाम साधते.

इफ्फी मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सुमारे 15 चित्रपटांतील महिला कलाकारांमधून आंतरराष्ट्रीय ज्युरीने निवडलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीला हा पुरस्कार प्रदान केला जातो. 10 लाख रुपये, प्रमाणपत्र आणि सिल्व्हर पीकॉक पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

5. भारतीय चित्रपट निर्माता ऋषभ शेट्टीला कांतारा साठी विशेष ज्युरी पुरस्कार:

समीक्षकांच्या प्रशंसेला पात्र ठरलेले भारतीय चित्रपट निर्माते ऋषभ शेट्टी यांना कांतारा चित्रपटासाठी विशेष ज्युरी पुरस्कार घोषित झाला आहे. ज्युरी सदस्यांनी विशेष नमूद केले आहे, ”एक अत्यंत प्रभावी कथा सादर करण्याच्या दिग्दर्शकाच्या क्षमतेसाठी. हा चित्रपट जरी विशिष्ट जंगलातील संस्कृतीत रुजलेला असला, तरी संस्कृती आणि सामाजिक स्थितीचे बंधन पार करत तो प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतो.”

शेट्टी यांचा चित्रपट एका काल्पनिक गावात मानव आणि निसर्ग यांच्यातील वैचारिक संघर्ष उलगडतो आणि  परंपरा आणि आधुनिकतेच्या संघर्षामधून एक मार्मिक संदेश देतो.

ऋषभ शेट्टी हे कन्नड चित्रपट सृष्टीतील अभिनेते आणि चित्रपट निर्माते आहेत. समीक्षकांनी प्रशंसा केलेल्या ब्लॉकबस्टर, ‘कांतारा’ साठी ते ओळखले जातात. त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये ‘सरकारी ही’ साठी 66 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपट पुरस्कार, प्रा. शाले, कासारगोडू, कोडुगे: रामण्णा राय, आणि ‘किरिक पार्टी’, या चित्रपटांचा समावेश आहे.

हा विशेष पुरस्कार ज्युरी कडून एखाद्या चित्रपटाला अथवा कलाकाराला त्याच्या/तिच्या कलात्मक योगदानाबद्दल दिला जातो. सिल्व्हर पीकॉक पदक, रु. सिल्व्हर पीकॉक पदक लाख आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

दक्षिण कन्नडमधील  काल्पनिक गावात घडणारा हा चित्रपट मानव आणि निसर्ग यांच्यातील वैचारिक संघर्षाचा शोध घेतो. जंगलासोबत राहणाऱ्या  या जमातीने अनुसरलेल्या काही प्रथा आणि परंपरांमुळे निसर्ग मातेला धोका निर्माण होतो, असे समजणाऱ्या वन अधिकाऱ्यामुळे या जमातीच्या सह अस्तित्वावर परिणाम होतो.  तो त्यांच्या देवदेवतेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो ज्यामुळे जमिनीशी संबंधित परंपरा आणि संस्कृतीबरोबर अहंकाराची लढाई उत्पन्न होते. शिवा हा नायक कंबाला महोत्सवातील अव्वल स्पर्धक आहे.  जंगलातील मौल्यवान झाडांची बेकायदेशीरपणे तोड आणि विक्री करत तो वनखात्यासाठी गंभीर धोका निर्माण करतो.  जंगलाची नासधूस केल्याबद्दल वनविभाग शिवा आणि त्याच्या साथीदारांची चौकशी करतो.  या जमातीची अशी श्रद्धा आहे की त्यांना पूर्वी एका राजाने हे जंगल दान केले होते.  शिवा स्वतःचे अस्तित्व टिकवून गावातील शांतता आणि एकोपा पुन्हा प्रस्थापित करू शकेल का, हा चित्रपटाचा गाभा आहे.

6. रेगर आझाद काया यांना  व्हेन द सीडलिंग्ज ग्रो या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटाचा दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. 

एक आश्वासक चित्रपट निर्माते असणाऱ्या रेगर आझाद काया यांना व्हेन द सीडलिंग्ज ग्रोसाठी दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.  ज्युरी म्हणतात की हा चित्रपट एक अशी कथा कथन करतो जी आपल्याला एक बाप, मुलगी आणि हरवलेल्या मुलाच्या आयुष्यातील एक दिवस छोट्या छोट्या घटनांमधून उलगडून दाखवण्यात यशस्वी होते.  पात्रांमधल्या जिव्हाळ्याची  तसेच देश आणि त्यातील आघातांची ही कथा आहे . हा चित्रपट एक बाप, मुलगी आणि हरवलेल्या मुलाच्या आयुष्यातील एका दिवसाचे मार्मिक चित्रण आहे, ज्यामध्ये देशावरील आघातांची  कहाणी खुबीने रचली आहे.

शॉर्टलिस्ट केलेल्या चित्रपटांच्या दिग्दर्शकांपैकी आंतरराष्ट्रीय ज्युरींनी निवडलेल्या पदार्पणातील दिग्दर्शकाला हा पुरस्कार दिला जातो. जागतिक चित्रपटसृष्टीतील सर्वात आशादायक अशा  नवीन दिग्दर्शकीय प्रतिभा ओळखणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे या पुरस्काराचे उद्दिष्ट आहे.

या विभागात पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांमध्ये प्रतिष्ठित रौप्य मयूर पदक, 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्रासाठी स्पर्धा होती.

व्हेन द सीडलिंग्ज ग्रो चित्रपटातील एक दृश्य.

चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेचा वेध घेणारा गोल्डन पीकॉक अर्थात सुवर्ण मयूर पुरस्कार हा जगातील प्रतिष्ठित चित्रपट सन्मानांपैकी एक आहे.  या वर्षीच्या ज्युरींमध्ये भारतीय चित्रपट निर्माते शेखर कपूर, ज्युरींचे अध्यक्ष तर स्पॅनिश सिनेमॅटोग्राफर जोस लुईस अल्केन, फ्रेंच चित्रपट निर्माते जेरोम पेलार्ड आणि कॅथरीन दुसार्ट आणि ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्मात्या हेलन लीक यांसारख्या चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा समावेश आहे.

स्पर्धक चित्रपटांमध्ये वुमन ऑफ (मूळ शीर्षक- कोबीटा झेड), द अदर विडो (मूळ शीर्षक- पिलेगेश), द पार्टी ऑफ फूल्स (मूळ शीर्षक- कॅप्टिव्हज), मेझर्स ऑफ मेन (मूळ शीर्षक- डेर वर्मेसेन मेन्स), लुबो, हॉफमन्स फेअरी  टेबल्स (मूळ शीर्षक: स्काझ्की गोफमाना), एंडलेस बाॅर्डर्स (मूळ शीर्षक: मारझाये बाई पायन),  डाय बिफोर डेथ (मूळ शीर्षक: उमरी प्रिजे स्मर्टी), बोस्नियान पॉट (मूळ शीर्षक: बोसान्स्की लोनाक), ब्लागाज  लेसन्स (मूळ शीर्षक: उरोटसाईट नाब्लागा ), असोग, एंड्रागोगी (मूळ शीर्षक: बुडी पेकेर्ती) आणि तीन भारतीय चित्रपट कांतारा, सना आणि मीरबीन यांचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine
Ghe Bharari

Most Popular

Recent Comments