पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भाजपच्या तीन तसेच शिंदे गटाच्या शिवसेनेच्या दोन उमेदवारांचे एबी फॉर्म छाननी प्रक्रियेत अवैध ठरवून रद्द करण्यात आले आहेत. परिणामी, या पाचही उमेदवारांना आता पक्षाच्या अधिकृत चिन्हाशिवाय अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागणार आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रभागातच युतीतील दोन्ही पक्षांना हा धक्का बसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर एबी फॉर्म दाखल केल्याचा आक्षेप विरोधी उमेदवारांनी घेतला होता. त्यानंतर झालेल्या छाननीत निवडणूक अधिकाऱ्यांनी हे फॉर्म बाद केले.
या निर्णयामुळे प्रभाग २४ मध्ये भाजपकडून कमळ या चिन्हावर आता केवळ एकच उमेदवार निवडणूक रिंगणात राहिला आहे. चिन्ह बदलल्याने संबंधित उमेदवारांची मोठी कोंडी झाली असून, प्रचारासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. नव्या चिन्हाची ओळख मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, संपूर्ण पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता टिकवण्याचे आव्हान भाजपसमोर असताना, प्रभाग २४ मधील या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणाची गणिते बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


