१० जुलै २०२१,
‘रॉ’ संस्थेची (RAW) भीती दाखवून तरुणीकडून 10 लाख रुपये उकळल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी 30 वर्षीय तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोशल नेटवर्किंग साईटवर झालेल्या ओळखीनंतर तरुणाने तक्रारदार तरुणीकडून पैसे उकळले.
अमेरिकन तपास संस्थेचा अधिकारी असल्याची बतावणी आरोपीने तरुणीला केली होती. ‘रॉ’ या तपास संस्थेची नजर असल्याची भीती दाखवत त्याने तरुणीकडून 10 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 28 वर्षीय धनश्री हासे या तरुणीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
चतुःशृंगी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. 30 वर्षीय अमित अप्पासाहेब चव्हाण असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो पुणे जिल्ह्यात बारामती एमआयडीसी परिसरात राहतो. एका सोशल नेटवर्किंग साईटवर आरोपी आणि फिर्यादी तरुणी या दोघांची ओळख झाली होती
एप्रिल ते 7 जुलै दरम्यान ‘रॉ’ संस्थेची भीती दाखवून त्याने तरुणीकडून 10 लाख रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला गजाआड केले. पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.


