६ जुलै २०२१,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा राजकीय व्यासपीठावर उदोउदो सुरू असला तरी छत्रपतींचे ऐतिहासिक गडकोट किल्ले किंवा त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तू आजही दुर्लक्षित आहेत. ऐतिहासिक वास्तूंची अशी हेळसांड होत असताना भिवंडीतील मराडेपाडा (कोशिंबे) येथील शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अनोखे मंदिर उभारले जात आहे. एक एकर जागेत साकारत असलेले हे भव्य मंदिर सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास प्रतिष्ठानला आहे.
मुगल साम्राज्यात भिवंडी शहर हे मोठे व्यापार केंद्र होते. देश-विदेशातील लोक या ठिकाणी येऊन व्यवसाय करत होते. परंतु ते मुगलशाहीला कंटाळले होते. त्यावेळी शिवाजी महाराजांनी मुगलांचा पराभव करून, भिवंडी, कल्याणसारखी शहरे काबीज केली होती. ऐतिहासिक अशा भिवंडीमध्ये शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श झाल्याचा उल्लेखदेखील सापडतो. अशा भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा (कोशिंबे) गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आकार घेत असल्याची माहिती शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी यांनी दिली.
आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथे शिवाजी महाराजांचे मोठे मंदिर बांधले आहे. आता भिवंडीत गेल्या तीन वर्षांपासून भव्य मंदिराचे काम सुरू आहे. मंदिरासभोवताली सुमारे एक एकरचा परिसर असून साधारण तीन गुंठ्यांच्या जागेत मंदिर बांधले जात आहे. ५५ फूट उंचीच्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची साडेसात फूट उंचीची मूर्ती ठेवण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेकावेळी शिवाजी महाराज सिंहासनावर बसले होते, अशाच स्वरूपाची काळ्या दगडाची मूर्ती विराजमान होणार आहे. ही खास मूर्ती म्हैसूर (कर्नाटक) येथे घडवली जात आहे. मंदिरासभोवताली किल्ल्याची तटबंदी बांधण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे शिवक्रांती प्रतिष्ठानचे साईनाथ चौधरी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. त्यांचे मंदिर बांधावे हे गेल्या अनेक वर्षांपासून मनात होते. त्यामुळे आमच्या एक एकर जागेत मंदिर बांधण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या सर्वांनी मिळून घेतला. मंदिरात आल्यावर एक ऊर्जा मिळावी, अशा दृष्टीने रचना करण्यात आली असून मंदिराचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. भविष्यात मोकळ्या जागेच्या काही भागात एक वृद्धाश्रम बांधण्याचा मानस आहे. शिवव्याख्याते घडवणे, योगशिबीर, पर्यावरण संरक्षण आदी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.- राजूभाऊ चौधरी, अध्यक्ष, शिवक्रांती प्रतिष्ठान, भिवंडी