“ग्राहकांना उत्तम सेवा देऊ पाहणाऱ्या जवळपास 61 महिला उद्योजिकांचे वैविध्यपूर्ण स्टॉल पाहिले. दर्जेदार वस्तू आणि व्यवसायाचा दुर्दम्य विश्वास या महिलांच्या चेहऱ्यावर दिसला. छोटे व महिला व्यावसायिक, घरगुती व्यवसाय करणाऱ्या गृहिणी अशा सगळ्यांना प्रोत्साहन व पाठबळ देण्याचा प्रयत्न ‘घे भरारी’ प्रदर्शनातून होत आहे. या ग्रुपमुळे अनेकजणी सक्षमपणे आपला व्यवसाय विस्तारत आहेत, याचा आनंद वाटतो,” असे मत आज अनेक ग्राहकांनी व्यक्त केले.
छोट्या व महिला व्यावसायिकांच्या ‘घे भरारी’ या फेसबुक ग्रुप तर्फे 16/17/18 फेब्रुवारी 2024 या कालावधीत आयोजित तीन दिवसीय ‘घे भरारी’ प्रदर्शनाचे आकुर्डी , सीझन्स हॉल , 3 रा मजला येथे उद्घाटन झाले.
सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
घे भरारी प्रदर्शनाची व्याप्ती पुणे ,नाशिक , मुंबई ,ठाणे , कोल्हापूर अशी वाढत आहेत. आठ हजारपेक्षा जास्त उद्योजिका आणि लाखो ग्राहक जोडण्याचे काम या घे भरारी ग्रुपने केले आहे.
यातून महिलांमधील कलागुणांना वाव मिळत आहे. साड्या, दागिने यासह विविध कलाकुसरीच्या व पर्यावरणपूरक वस्तू बनवत महिला स्वतःला व्यवसायिकतेकडे घेऊन जात आहेत .
संयोजक नीलम उमराणी-एदलाबादकर म्हणाल्या, “लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतील असे 61 स्टॉल येथे आहेत. गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, रेडिमेड डिझायनर ड्रेस, हर्बल प्रॉडक्ट्स, आयुर्वेदिक औषधे, गिफ्ट आर्टिकल, चंदेरी कलमकारी साड्या, आकर्षक नक्षीकाम केलेल्या ओढण्या, लहानांसाठी खेळणी असे वैविध्यपूर्ण स्टॉल येथे आहेत.
‘घे भरारी’च्या माध्यमातून महिलांना, स्टार्टअपना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आहे. जवळपास ८० टक्के महिलांचा सहभाग या प्रदर्शनात असून, इतर तरुण मुलांचे स्टार्टअप यात आहेत. प्रदर्शनातून महिला व्यावसायिकांना अनेक ग्राहकांना जोडता येते असे संयोजक राहुल कुलकर्णी यांनी नमूद केले.