Saturday, March 22, 2025
Homeउद्योगजगतपथारीवाल्यांचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी शहरात सर्वेक्षण करण्यात येणार-आयुक्त राजेश पाटील

पथारीवाल्यांचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी शहरात सर्वेक्षण करण्यात येणार-आयुक्त राजेश पाटील

पिंपरी चिंचवडला देशातील स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्याच्या दृष्टीने आपण वाटचाल करीत असून पथारीवाल्यांचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी शहरात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याकामी फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

पंचवार्षिक सर्वेक्षण २०२१-२२ च्या पूर्व तयारीबाबत आज शहर फेरीवाला समितीची बैठक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त नंदकिशोर भोसले, महापालिका क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, सोनम देशमुख, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड, राजेश आगळे, सिताराम बहुरे, विजय थोरात, रविकिरण घोडके, भूमी आणि जिंदगी विभागाचे प्रशासन अधिकारी मुकेश कोळप, टपरी पथारी हातगाडी पंचायतीचे प्रल्हाद कांबळे, अनिता सावळे, रमेश शिंदे, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे रफिक शेख, जाणीव संघटनेचे संजय शंके तसेच पथारीवाला संघटनांचे प्रतिनिधी प्रविण कांबळे, अॅड. बी. के. कांबळे, दामोदर मांजरे, मनिषा राऊत, ज्ञानेश्वर मोरे, सरोज अंबिके, डॉ. शिवदास पाटील आदी उपस्थित होते.

हॉकर्स व्यवस्थापन प्रणालीचे संगणकीय सादरीकरण आणि धोरणाबाबतची प्राथमिक माहिती सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी यांनी दिली. यानंतर संघटनांच्या प्रतिनिधींनी विविध सूचना बैठकीत मांडल्या. यामध्ये अतिक्रमण कारवाई करताना फेरीवाले आणि पथारी व्यावसायिकांना सौजन्याची वागणूक द्यावी, यापूर्वी झालेल्या सर्वेक्षणातील पथारीवाल्यांना प्राधान्य असावे, फेरीवाल्यांचे योग्य जागी पुनर्वसन करुन त्यांना प्रमाणपत्र व ओळखपत्र द्यावे, फेरीवाल्यांकडील माल जप्तीची कारवाई करु नये, सर्वेसोबत जागा निश्चिती करावी आदी सुचनांचा समावेश होता.

संघटना प्रतिनिधींनी केलेल्या योग्य सूचनांचा अंतर्भाव फेरीवाला धोरणामध्ये केला जाईल असे आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, शासनाच्या अधिनियमाप्रमाणे महापालिका फेरीवाल्यांचे व्यवस्थापन करीत आहे. शहराची लोकसंख्या विचारात घेता पथारीवाल्यांचे सुयोग्य नियोजन करणे गरजेचे आहे. पथारीवाले नागरिकांना सेवा देत असतात. व्यवसायावर त्यांची उपजीवीका सुरु आहे. त्यामुळे पोटापाण्याचा व्यवसाय उध्वस्त करण्याचा उद्देश नसून सर्वांना विश्वासात घेऊन पथारीवाल्यांचे नियोजन करण्यासाठी महापालिका काम करीत आहे. कोणत्याही विक्रेत्याने रस्त्याच्या मधोमध, वाहतुकीस अडथळा ठरेल अशा ठिकाणी अथवा नागरिकांची अडचण होईल अशा जागेवर व्यवसाय करु नये. पथारीवाल्यांसाठी जागा निश्चिती करताना त्या ठिकाणी स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दिवाबत्ती, बैठकीची व्यवस्था करण्यासाठी महापालिका नियोजन करीत आहे.

निर्माण होणा-या कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेला सुकर व्हावे यादृष्टीने पथारीवाल्यांनी सहकार्य करावे. शहरात भाजी मार्केट, खाऊ गल्ली, फुड मार्ट तयार करण्याचा विचार असून त्यादृष्टीने जागा निश्चिती करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. सर्वे करताना संघटनांना विश्वासात घेऊन काम केले जाईल. तसेच लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या सूचनांचा अंतर्भाव देखील त्यात असेल असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. राहण्यायोग्य शहराच्या इंडेक्समध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने महापालिकेने पावले उचलली असून यामध्ये नागरिक आणि पथारीवाले यांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पथारीवाल्यांसह संघटनांनी देखील महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments