देशातील अखंडता टिकवून ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत, म्हणून हा पुतळा उभारण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य पुतळा पुण्यातील लवासा येथे उभारण्यात येणार आहे. डार्विन प्लॅटफॉर्म समूहाने हा प्रकल्प हाती घेतला असून जगातील सर्वांत उंच पुतळा बनवण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत या पुतळ्याचे काम पूर्ण होऊन अनावरण केले जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.
“देशातील अखंडता टिकवून ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. त्यांच्यानिमित्ताने देशाला दूरदर्शी नेता मिळाला आह. त्यांच्या प्रयत्नांना सलाम करण्याकरता त्यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे”, असं डार्विनचे प्रमुख अजय हरिनाथ सिंह यांनी सांगितले.
स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षाही उंच पुतळा
गुजरात येथे असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या पुतळ्यापेक्षा मोदींच्या पुतळ्याची उंची जास्त असणार आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी १८२ मी आहे. तर, मोदींचा पुतळा १९० ते २०० मीटर असणार आहे.
प्रकल्पाचे वैशिष्ट्य काय?
पुण्यातील मुळशी तालुक्यातील लवासा सिटीत उभारण्यात येणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भव्य पुतळा हा जगातील सर्वांत उंच पुतळा असणार आहे. १९०-२०० मीटर उंचीचा हा पुतळा बनवण्यात येणार असून भारताचा वारसा, नवीन भारताच्या आकांक्षा दर्शवणारं एक संग्रहालय, स्मारक उद्यान, मनोरंजन केंद्र आणि प्रदर्शन हॉलही याठिकाणी असणार आहे. प्रदर्शन हॉलमध्ये नरेंद्र मोदी यांचा जीवनपट दाखवण्यात येणार आहे.
लवासा विकासासाठी डार्विनला NCLT कडून परवानगी
मुळशी तालुक्यात विकसित करण्यात आलेले लवासा सिटी हे खासगी नियोजित आणि मोठे हिल स्टेशन आहे. या प्रकल्पात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे जावाई सदानंद सुळे यांची भागिदारी होती. तसंच, अजित गुलाबचंदसुद्धा या कंपनीचे भागिदार होते. परंतु, काही वर्षांनी हा प्रकल्प दिवाळखोरीत निघाल्याने डार्विन समूहाने विकत घेतला. यासाठी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने डार्विनला मंजुरी दिली आहे.