पिंपरी अल्पवयीन चौदा वर्षीय मुलीची छेड काढणाऱ्या विकृताला वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. प्रिन्सकुमार विजय ठाकूर असे आरोपी तरुणाचे नाव आहे. पीडित अल्पवयीन मुलीची तो भर रस्त्यात हात धरून छेड काढायचा. पीडित अल्पवयीन मुलगी घराच्या पाठीमागे असलेल्या बाथरूममध्ये गेल्यानंतर तिथे अगोदरच दबा धरून बसलेल्या आरोपीने मुलीला मिठी मारून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपी प्रिन्सकुमार राहतो. तो बेकरीत काम करायचा. बेकरीसमोरून पीडित अल्पवयीन मुलगी नेहमी जायची. एकतर्फी प्रेम जडलेल्या प्रिन्सकुमारने अल्पवयीन मुलीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. एके दिवशी त्याने अल्पवयीन मुलीचा भर रस्त्यात हात धरून छेड काढली. ‘तू मला भेटायला ये,’ असे म्हटल्यानंतर मुलीने नकार दिला. याचा राग मनात धरून तुझे फोटो व्हायरल करीन, अशी धमकी आरोपीने पीडितेला दिली.
मुलीने याबाबत कोणाला काहीही सांगितले नाही. एके दिवशी मुलगी घराच्या पाठीमागे असलेल्या बाथरूममध्ये गेली तिथे अगोदर दबा धरून बसलेल्या प्रिन्सकुमारने पीडितेला मिठी मारून अश्लील स्पर्श केला. या छेडछाडीला कंटाळून अखेर मुलीने संबंधित बाब तिच्या आईला सांगितली. आईने वाकड पोलीस ठाणे गाठत आरोपीविरोधात विनयभंगाची तक्रार दिली. या तक्रारीवरून प्रिन्सकुमारला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.