दाट लोकवस्तीच्या मध्यभागी कचऱ्याचे ढीग वाढल्याचा आरोप; दुर्गंधी, प्रदूषण व साथीच्या रोगांची भीती, आंदोलनाचा इशारा
पिंपरी-चिंचवड : मोशी येथील कचरा डेपोमध्ये झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर शहरातील मोठ्या प्रमाणातील कचरा कृष्णानगर स्पाईन रोड परिसरात आणून टाकला जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे कृष्णानगर, महात्मा फुलेनगर, भीमशक्ती नगर आणि मोरे वस्ती या दाट लोकवस्तीच्या परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात दिवसेंदिवस कचऱ्याचे ढीग वाढत असून दुर्गंधी, माशा, डास आणि वाढते प्रदूषण यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात शाळा, रुग्णालये तसेच हजारो नागरिकांची वस्ती असल्याने संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मोशी दुर्घटनेत अनेक कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतरही प्रशासनाने लोकवस्तीच्या मध्यभागी कचऱ्याचे तात्पुरते संकलन सुरू केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीती आणि तीव्र नाराजी पसरली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मारुती गणपत जाधव यांनी प्रशासनाने हा कचरा तातडीने इतर सुरक्षित ठिकाणी हलवून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे. तसेच या निर्णयामागील कारणांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशीही मागणी त्यांनी केली.
यासंदर्भात लवकरच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्रा अजित पवार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती मारुती गणपत जाधव यांनी दिली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारा हा प्रकार तात्काळ थांबवावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.


