Sunday, December 3, 2023
Homeताजी बातमीप्रशासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे चक्क नाल्यात बसून उपोषण

प्रशासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचे चक्क नाल्यात बसून उपोषण

आकुर्डी भागातील नाल्यांची नियमितपणे आणि व्यवस्थित साफसफाई होत नसल्याचा आरोप करत याकडे प्रशासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चक्क नाल्यात बसून उपोषण केले.राष्ट्रवादीचे पिंपरी विधानसभा कार्याध्यक्ष इखलास सय्यद यांनी बुधवारी आकुर्डीत नाल्यात बसून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. उपोषणाला महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, मनसेचे संघटक के. के. कांबळे यांनी पाठिंबा दिला.

आकुर्डी भागातून दोन मोठे नाले वाहतात. गेल्या अनेक महिन्यांपासून नालेसफाई वेळेवर होत नाही. नाल्याच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. ठिकठिकाणी नाले मोठ्या प्रमाणात तुंबले असून डास वाढले आहेत. डासांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने उपोषणाला बसल्याचे सय्यद यांनी सांगितले.

‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाचे साहाय्यक आरोग्य अधिकारी राजू साबळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. सात दिवसांच्या आत सर्व नालेसफाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर सय्यद यांनी उपोषण मागे घेतले.

प्रशासनाने सात दिवसांत नालेसफाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे उपोषण मागे घेतले. सात दिवसात नालेसफाई न झाल्यास पुन्हा नाल्यात पाच दिवसांचे उपोषण करणार आहे. -इखलास सय्यद

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments