Tuesday, March 18, 2025
Homeगुन्हेगारीआकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा खोटा ई-मेल आल्याने खळबळ…

आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा खोटा ई-मेल आल्याने खळबळ…

आकुर्डी येथील डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल प्राप्त झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. हा मेल आज सकाळी साडेआठच्या सुमारास कॉलेज प्रशासनाला मिळाला, त्यानंतर तातडीने पोलिसांना याची माहिती देण्यात आली. याची तातडीने दखल घेत मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा कॉलेजमध्ये पाठवण्यात आला. बॉम्ब शोधक/नाशक पथक (BDDS) आणि श्वानपथकाच्या मदतीने संपूर्ण कॉलेजची कसून झडती घेतली. मात्र, पाच ते सहा तास तपास केल्यानंतर हा ई-मेल पूर्णपणे खोटा असल्याचे निष्पन्न झाले.

बॉम्ब ठेवल्याचा ई-मेल मिळताच पोलिसांनी जलद गतीने कारवाई केली. अचानक पोलिसांचा मोठा ताफा कॉलेजमध्ये पोहोचल्याने विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये घबराट पसरली. पोलिसांनी तत्काळ संपूर्ण कॉलेज रिकामे करण्याचे आदेश दिले आणि सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढून तपासणी सुरू केली. परिसरात तपासणी सुरू असताना अफवांना उधाण आले. त्यामुळे पालकांनीही घाईघाईने कॉलेजकडे धाव घेतली.

बॉम्ब शोध पथक आणि सायबर सेलच्या मदतीने संपूर्ण कॉलेज परिसराची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तब्बल पाच ते सहा तास शोध घेतल्यानंतर हा ई-मेल खोटा असल्याचे वरिष्ठ निरीक्षक नितीन फटांगरे यांनी जाहीर केले. 

यापूर्वीही अशा स्वरूपाचे धमकीचे मेल शाळा, रुग्णालये आणि महाविद्यालयांना मिळाले आहेत. त्यावेळीही कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नव्हती. त्यामुळे कोणीतरी खोडसाळपणा करत असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर सेल आणि गुन्हे शाखेच्या विशेष पथकातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पोलिसांनी पालक आणि विद्यार्थ्यांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणात ज्या ई-मेल अकाऊंटवरून धमकी पाठवण्यात आली आहे, त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर क्राइम सेलकडून तपास सुरू आहे. अशा खोट्या ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments