Friday, September 11, 2026
Homeउद्योगजगत पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार मनोरंजनाची ‘सांस्कृतिक मेजवानी’; गणेशोत्सवात रंगणार ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६

 पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार मनोरंजनाची ‘सांस्कृतिक मेजवानी’; गणेशोत्सवात रंगणार ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६

नाट्य, संगीत, साहित्य, लोककला, मर्दानी खेळांसह विविध कार्यक्रम; शहरातील गुणवंतांचा ‘रत्न’ पुरस्कारांनी गौरव

पिंपरी-चिंचवड, दि. २१ ऑगस्ट २०२६ : पिंपरी-चिंचवड शहरातील सांस्कृतिक चळवळीला व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘पिंपरी-चिंचवड महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दि. १८ ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत तीन दिवसीय महोत्सव रंगणार आहे, अशी माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली.

महोत्सवाच्या आयोजनाबाबत आयोजित पत्रकार परिषदेत महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी महोत्सवाचे स्वरूप आणि नियोजित कार्यक्रमांची माहिती दिली.

पिंपरी-चिंचवड शहराने औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रासोबतच कला, साहित्य, नाट्य, संगीत, क्रीडा आणि लोकसंस्कृतीच्या क्षेत्रातही आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शहरातील या सांस्कृतिक ऊर्जेला एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणे, विविध पिढ्यांना सांस्कृतिक उपक्रमांशी जोडणे आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक एकोपा अधिक दृढ करणे हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे.

तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

तीन दिवसीय महोत्सवात सर्व वयोगटांतील नागरिकांना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. नाट्यरसिकांसाठी दर्जेदार आणि लोकप्रिय व्यावसायिक मराठी नाटकांचे विशेष प्रयोग सादर केले जाणार आहेत. तसेच नामवंत गायक-कलाकारांच्या सहभागातून भावगीत, नाट्यगीत, भक्तिगीत आणि लोकप्रिय मराठी-हिंदी गीतांची संगीत मैफल रंगणार आहे.

महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि लोकपरंपरेचे दर्शन घडविणारी पारंपरिक लावणी, तरुणाईसाठी आधुनिक संगीत व फ्यूजनचा समावेश असलेला रॉक बँड परफॉर्मन्स आणि सामाजिक विषय, हास्य-विनोद तसेच समकालीन आशय मांडणाऱ्या नामवंत कवींचे राज्यस्तरीय कवी संमेलन ही महोत्सवाची प्रमुख आकर्षणे ठरणार आहेत.

महिलांच्या कलागुणांना आणि सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी पाककला स्पर्धा आणि फॅशन शो आयोजित करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राच्या शौर्यपरंपरेचे दर्शन घडविणाऱ्या लाठी-काठी, दांडपट्टा यांसह विविध मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकेही सादर केली जाणार आहेत.

बालकलाकारांच्या अभिनय आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी बालनाट्य व बाल एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. पारंपरिक वस्तू, हस्तकला, स्थानिक कलाकुसर आणि खाद्यसंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘संस्कृती जत्रा’ व प्रदर्शनाचे आयोजनही करण्यात येणार आहे.

शहरातील गुणवंतांचा ‘रत्न’ पुरस्कारांनी गौरव

पिंपरी-चिंचवडच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या आणि आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंत व्यक्तींचा महोत्सवादरम्यान विशेष गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये ‘कलारत्न’, ‘साहित्यरत्न’, ‘क्रीडारत्न’, ‘नृत्यरत्न’ आणि ‘संगीतरत्न’ या पुरस्कारांचा समावेश आहे.

या पुरस्कारांच्या माध्यमातून शहरातील गुणवंतांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या योगदानाला प्रोत्साहन देण्याचा महोत्सव समितीचा प्रयत्न आहे.

‘उद्योगनगरीसोबत सांस्कृतिक नगरी म्हणूनही ओळख दृढ व्हावी’

पिंपरी-चिंचवड हे देशातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून ओळखले जाते. मात्र, शहराला कला, साहित्य, नाट्य, संगीत आणि लोकसंस्कृतीचीही समृद्ध परंपरा लाभली आहे. शहरातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत ही सांस्कृतिक ओळख अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने महोत्सव महत्त्वपूर्ण ठरेल.

हा महोत्सव केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता कलाकार, नागरिक आणि विविध पिढ्यांना एकत्र आणणारे सांस्कृतिक व्यासपीठ ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

गणेशोत्सवाच्या आनंदात भर घालणाऱ्या या तीन दिवसीय महोत्सवात शहरातील नागरिक, कलाप्रेमी, महिला, युवक-युवती आणि विद्यार्थ्यांनी कुटुंबीयांसह मोठ्या संख्येने सहभागी होऊन विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

महोत्सवाचा तपशील :

कालावधी : १८ ते २० सप्टेंबर २०२६

स्थळ : प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

आयोजक : पिंपरी-चिंचवड महोत्सव समिती

स्पर्धा नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :

मनोज डाळीम्बकर — ८२३७३३२२११

राजेंद्र बंग — ९८२२३१३०६६

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments