Tuesday, April 21, 2026
Homeताजी बातमीगोंड, वारली, मधुबनी कलेचा संगम…! मनपा शाळेतील ‘आर्ट मेळा’ ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

गोंड, वारली, मधुबनी कलेचा संगम…! मनपा शाळेतील ‘आर्ट मेळा’ ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत श्रीमती अनुसयाबाई नामदेव वाघेरे इंग्लिश मीडियम स्कूल, पिंपरी येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणाऱ्या ‘आर्ट मेळा’चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या कलात्मक अनुभवांसह सर्जनशील संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

महापालिका अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा सुरू झाला. यावेळी अतिरिक्त आयुक्त बगाडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृती पाहून त्यांनी त्यामागील कल्पना आणि सादरीकरणाची माहिती विद्यार्थ्यांकडून घेतली. तसेच त्यांच्या कलाकृती व सादरीकरणांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी वारली कलेतून शनिवार वाडा, गोंड आर्टद्वारे गेट वे ऑफ इंडिया, तसेच एस. एच. रझा यांच्या कलेपासून प्रेरित गाव अशा विविध विषयांवर आधारित कलाकृती साकारल्या होत्या.

या आर्ट मेळ्याची संकल्पना पारंपरिक व लोककला अशी होती. त्यानुसार संपूर्ण आर्ट मेळ्यातील कार्यशाळा, प्रदर्शने आणि उपक्रम भारतीय लोककला व पारंपरिक कलेभोवती केंद्रित करण्यात आले होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेतील सुमारे ३० शाळांमधील विद्यार्थ्यांनी पारंपरिक व लोककलांपासून प्रेरणा घेत विविध ३डी (3D) मॉडेल्स साकारली. विद्यार्थ्यांनी केवळ कलाकृती सादर केल्या नाहीत, तर त्या मागील संकल्पना, आशय आणि कलाशैली यांची माहिती उपस्थितांना दिली.

या आर्ट मेळ्याचे आयोजन पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हार्डिकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे आणि उपायुक्त ममता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशासन अधिकारी संगिता बांगर, कला नोडल अधिकारी श्रीकांत चौगुले यांच्या अधिपत्याखाली व आकांक्षा फाउंडेशन यांच्या सहकार्याने  करण्यात आले होते.

या आर्ट मेळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे देशातील विविध राज्यांतील पारंपरिक कलाकारांचा सहभाग हे ठरले. या कलाकारांनी विद्यार्थ्यांसाठी थंगका, ऍप्लिक वर्क, गोंड चित्रकला आणि लेदर क्राफ्ट यांसारख्या पारंपरिक कलांच्या कार्यशाळा घेतल्या. या कार्यशाळांमधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कलाकारांकडून लोककलेचे तंत्र, इतिहास आणि सांस्कृतिक महत्त्व जाणून घेण्याची संधी मिळाली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी पारंपरिक व लोककलेच्या माध्यमातून आपली सर्जनशीलता प्रभावीपणे सादर करत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना केवळ कला शिकण्याचीच नव्हे, तर आपल्या सांस्कृतिक वारशाची ओळख निर्माण होते. कला, शिक्षण आणि संस्कृती यांचा संगम साधणारे हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे आहेत. – रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका

आर्ट मेळा सारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळते. पारंपरिक व लोककलेच्या माध्यमातून विचार मांडणे, संवाद साधणे आणि आत्मविश्वासाने सादरीकरण करणे,तसेच संघ भावना निर्माण होणे ही कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित होत आहेत. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी अशा सर्जनशील उपक्रमांतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहेत. – विक्रांत बगाडे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
dilipsonigara
Google search engine

Most Popular

Recent Comments