सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याला भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या नावाने टोळक्याने जिवे मारण्याची धमकी दिल्याची संतापजनक घटना चिंचवड येथे घडली आहे. या प्रकरणी अनुप मोरे यांच्यासह आठ जणांविरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३६ वर्षीय पीडित महिला भाजपमध्ये संघटनात्मक पदावर कार्यरत असून, त्यांनी २६ ऑक्टोबर रोजी चिंचवड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीनुसार आरोपींची नावे अशी आहेत — अनुप मोरे (वय ४३, रा. निगडी प्राधिकरण), अनिता तिपाले, एकविरा खान, प्रवीण यादव, आशिष राऊत, गौरव गोळे, सागर घोरपडे आणि जयेश मोरे.
२६ ऑक्टोबर रोजी दुपारी पीडित महिला ओळखीच्या व्यक्तीला भेटण्यासाठी चिंचवड येथे गेल्या असता काही संशयितांनी त्यांना अडवले. “आमचा दादा अनुप मोरे येथे असताना तू इथे का आलीस? तुला जिवंत ठेवणार नाही. तुला गाडीखाली घालून संपवू. अनुप मोरेने तुला संपवायचे सांगितले आहे. तुला बदनाम करुन जगणे अवघड करू,” अशा धमक्या त्या टोळक्याने दिल्या, असे फिर्यादीत नमूद आहे.
या धमकीनंतर घाबरलेल्या महिलेने परत बंगल्यात आसरा घेतला, पण त्यानंतर काही महिला व तरुणांनी त्यांच्या गाडीला घेराव घालून पुन्हा धमक्या दिल्या. पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेल्यावरही अनिता तिपाले आणि एकविरा खान यांनी ठाण्याच्या परिसरातच वाद घालून शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्याद नोंदवल्यानंतरही सुमारे शंभर जणांच्या गर्दीने पोलिस ठाण्याबाहेर “तुला ठार करू” अशी धमकी दिल्याचे महिलेने सांगितले आहे. पोलिस उपनिरीक्षक सुजाता पाटील या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, सुरुवातीला अनुप मोरे यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्यात आले होते. मात्र फिर्यादीने यावर आक्षेप घेतल्यानंतर पोलिसांनी अनुप मोरे यांचा नाव आरोपींमध्ये समाविष्ट केले. “नाव अनावधानाने राहून गेले,” असे पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे.
या प्रकरणामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली असून, पक्षातील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे
माझ्यावर झालेले आरोप हे राजकीय आहेत. मूळ भांडण हे भाजपा पदाधिकारी आणि माजी नगरसेविका जयश्री गावडे यांच्या घरात दरोडा पडत असल्याचा फोन आला म्हणून मी भाजपा पदाधिकारी म्हणून गेलो होतो मी पोलिसांच्या संपर्कात होतो आणि त्यावरून माझ्या वर गुन्हा दाखल झाला त्यावेळी मी तिथे नव्हतो आणि माझे नाव नंतर हेतू पुरस्सर पणे गुन्ह्यात अडकवले.तरी माझी नाहक बदनामी करणे हाच हेतू ह्यातून दिसंत आहेत.


