४ एप्रिल २०२१,
गेल्या महिनाभरापासून बिजलीनगर येथील रेल विहार वसाहत व साईराज कॉलनी परिसरातील शेकडो घरांना पाणीपुरवठा अतिशय कमी दाबाने होत होता, त्यामुळे परिसरात अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली.सदरची पाणी टंचाई ५ मार्चपासूनच सुरू झाली. गेल्या महिनाभरात काही घरांना अक्षरशः टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागला. पाण्याचा पुरवठा अपूर्ण होत असल्याकारणाने नागरिकांच्या तक्रारीत वाढ होत गेल्या.नगरसेवक व अधिकारी यांनाही सदरबाबत कळवले गेले.परंतु पाणी टंचाई व कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा प्रश्न जैसे थेच होता. अखेर(३ एप्रिल २०२१) आज रोजी सदरबाबत रेल वसाहत कॉर्नर येथील जलवाहिनीमध्ये काहितरी अडकले असल्याचे निष्पन्न झाले. दुरुस्त कर्मचाऱ्यांनी जलवाहिनी कापली असता त्यामध्ये २० किलो ची प्लास्टिक बादली अडकल्याचे दिसून आले.सदरची बादली जलवाहिनीमध्ये अडकून बसली होती.त्यामुळे पाणी पुरवठयामध्ये परिसरात अडथळा निर्माण झाला होता.अखेर तुकडे करून सदरची बादली जलवाहिनीमधून बाहेर काढण्यात आली.
या संदर्भात लिबर्टी लीग ऑफ इंडिया चे मुख्य प्रवर्तक व साईराज कॉलनी मधील रहिवाशी श्री मकरंद डोईजड म्हणाले,”साईराज कॉलनी मधील रहिवाशी कुटुंबांना सुमारे एक महिना पुरेश्या पाण्यापासून वंचित ठेवले, नागरिकांचा मानसिक छळ केला म्हणून पालिकेने नागरिकांना नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे.तसेच देखभाल नियोजनात प्रशासन कमी पडले हे अश्या प्रकारामुळे सामोरे आले आहे.”
तसेच या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष व ओम साई पार्क मधील रहिवाशी विजय पाटील म्हणाले,” शहरातील जलवाहिनी व त्यासंदर्भातील व्हॉल्व उपकरणे यांची देखभाल दुरुस्तीचा मोठा प्रश्न अश्या घटनांमुळे ऐरणीवर आलेला आहे. वेळीच योग्य देखभाल दुरुस्तीचे योग्य नियोजन केल्यास अश्या घटनांना आळा बसेल. बादली जलवाहिनीमध्ये कशी पोहचली ? हा एक वेगळाच विषय आहे.यामुळे पाणीपूरवठा टाकी सफाई कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा उघड झालेला आहे. पेंट केमिकल युक्त बादली मुख्य टाकीपर्यंत पोहचली कशी ? नागरिकांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार आहे.या बाबत प्रशासनाने गांभीर्याने बघणे आवश्यक आहे.आयुक्तांनी या बाबत खोल चौकशी करावी.दोषी व्यक्तींनवर कायदेशीर कारवाई करावी.”
या बाबत नाव न सांगण्याच्या अटीवर पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी यांनी असे सांगितले की जलवाहिनेमध्ये कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे वारंवार अनेक वेळा अश्या घटना घडलेल्या आहेत. या बाबत पालिकेकडे पाठपुरावा करण्यासासाठी साईराज कॉलनीमधील रहिवाशी बिपीन पवार,अमोल पाटील,फतेसिंग देवरे सर,राहुल भोसले,श्याम देसले,उमेश विसपुते यांनी प्रयत्न केला. या प्रसंगी नगरसेवक नामदेव ढाके सुद्धा स्वतः उपस्थित होते.