रॅपिडो बाईक टॅक्सीविरोधात रिक्षा संघटनांनी पुणे आरटीओ कार्यालयाबाहेर केलेल्या ठिय्या आंदोलनाविरोधात बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होतं. या आंदोलनामध्ये आरटीओ कार्यालयाच्या रस्त्यावर रिक्षा संघटनेकडून चक्काजाम करण्यात आला होता. वाहतुकीचा बोजवारा उडवल्यामुळे आंदोलनकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाईक टॅक्सी रॅपिड ॲपमुळे रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान होत असल्याचं सांगत रिक्षा संघटना आक्रमक झाल्या होत्या. याबाबत रिक्षा संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन देखील दिले होते. हे ॲप बंद करण्याची रिक्षा संघटनांची मागणी होती. या विरोधात त्यांनी काल २८ नोव्हेंबरला पुणे आरटीओ कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. याप्रकरणी रिक्षा संघटनेचे केशव क्षीरसागर, बाबा कांबळे, आनंद अंकुश यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रवाशांचे प्रचंड हाल
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी ‘रिक्षा बंद’चा फटका नागरिकांना सोमवारी बसला. ‘पीएमपी’ने अतिरिक्त १०० गाड्या सोडल्या, तरी त्या खचाखच भरून येत होत्या. नागरिकांना प्रवासासाठी वाहन न मिळाल्यामुळे बराच वेळ ताटकळत थांबावे लागले. काही ठिकाणी खासगी वाहनचालकांकडून जास्त पैसे आकारल्याच्या घटना घडल्या. या रिक्षा बंद आंदोलनात काही संघटनांनी भाग घेतला नसला, तरी त्यांनी भीतीने रिक्षा सुरू ठेवल्या नाहीत. त्यामुळे रस्त्यावर खूपच कमी रिक्षा दिसत होत्या.