पुणे-बेंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी; तसेच वाहतूक कोंडी होऊच नये, यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून स्वतंत्र वाहतूक विभाग निर्माण करण्यात आला आहे. या मार्गावरील बीटवाइज कंपनी ते चांदणी चौक (बावधन-सूस) या मार्गासाठी हा वाहतूक विभाग काम करणार असून, या विभागात दोन सहायक निरीक्षक आणि २० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे कर्मचारी दोन पाळ्यांमध्ये वाहतूक नियमन करणार आहेत.
सूस गावात जाणारा उड्डाणपूल दुरुस्ती आणि मेट्रोच्या कामामुळे बालेवाडी ते चांदणी चौक मोठी वाहतूक कोंडी होत आहे. त्यातच रहदारीच्या वेळेस वाढणाऱ्या वाहन संख्येमुळे या कोंडीत भर पडते. बाह्यवळ मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने या मार्गावरून जात असतात.
बाणेर ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरही मेट्रोचे काम सुरू असल्याने अनेक वाहने चांदणी चौकाच्या दिशेने जाऊन कोथरूडमार्गे पुणे शहरात प्रवेश करीत असल्याने सध्या बालेवाडी ते चांदणी चौक या पट्ट्यात मोठी कोंडी होते. परराज्यात जाणाऱ्या खासगी बस आणि मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची वाढती संख्या पाहता, सकाळी तीन तास आणि सायंकाळी तीन तास जड वाहनांना आता या मार्गावर मनाई करण्यात आली आहे; परंतु महामार्ग असल्याने या पट्ट्यातील सेवा रस्त्यांवरील चौक सोडले, तर वाहतूक पोलिस येथे नियुक्तीस नव्हते. त्यामुळे एखादे वाहन बंद पडले किंवा अपघात झाल्यावर हिंजवडीतून पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत वाहनांच्या काही किलोमीटर रांगा लागतात. चांदणी चौकापर्यंतचा परिसर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अखत्यारित असल्याने हिंजवडी वाहतूक विभागाकडूनच रावेत कॉर्नर ते चांदणी चौक या भागासाठी नियमन केले जात होते.
आयटी पार्क हिंजवडीत येणारी वाहने, द्रुतगती मार्गावरून शहरात येणारी वाहने आणि बाह्यवळण मार्गावरून शहराबाहेर जाणारी वाहने सगळ्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी स्वतंत्र वाहतूक विभाग कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. या पट्ट्यातील वाहतूक नियमनासाठी दोन सहायक निरीक्षक, २० कर्मचारी आणि एक क्रेन येणार आहे. आज, सोमवारपासून (२९ ऑगस्ट) हा विभाग सुरू होणार आहे.
हिंजवडीत वाहतूक विभागाअंतर्गत बीटवाइज कंपनी ते चांदणी चौक (बावधन-सूस) या पट्ट्यासाठी स्वतंत्र वाहतूक विभाग तयार करण्यात आला आहे. या भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दोन अधिकारी, २० कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. ५० वॉर्डनही या भागासाठी कार्यरत असणार आहेत. – आनंद भोईटे, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग, पिंपरी-चिंचवड