राज्यांच्या भांडवली खर्चात वाढ व्हावी व पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती मिळावी, यासाठी केंद्र सरकार आठ दिवसांमध्ये (२२ नोव्हेंबपर्यंत) ९५ हजार ८२ कोटी रुपयांचा निधी राज्यांना उपलब्ध करून देईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी रात्री पत्रकार परिषदेत दिली.
करोनानंतर राज्यांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी सीतारामन यांनी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे सोमवारी विशेष बैठक बोलावली होती. त्यात १५ राज्यांचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री सहभागी झाले होते. राज्यांच्या आíथक विकासाला गती मिळावी, यासाठी भांडवली खर्चात वाढ करण्याची गरज असल्याने राज्यांना आगाऊ निधी दिला जावा, अशी विनंती अनेक राज्यांनी केली. केंद्राला मिळणाऱ्या महसुलापैकी ४१ टक्के हिस्सा राज्यांना वितरित केला जातो. नोव्हेंबरमधील ४७ हजार ५४१ कोटींचा हप्ता नियमाप्रमाणे दिला जाईल, त्याशिवाय तितक्याच रकमेचा आणखी एक हप्ताही राज्यांना दिला जाणार आहे. त्यामुळे राज्यांना केंद्राच्या महसुली हिश्श्यातील दोन हप्ते एकत्रित मिळू शकतील. दरवर्षी मार्चमध्ये मिळणाऱ्या तीन हप्त्यांपैकी एक हप्ता नोव्हेंबरमध्ये आगाऊ दिला जाणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.
पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात झालेल्या कपातीमुळे होणारे महसुली नुकसान पूर्णपणे केंद्राला सहन करावे लागणार आहे. त्यामुळे राज्यांना मिळणाऱ्या महसुली हिश्श्यावर कोणताही परिणाम होणार नाही. केंद्राने करकपात केली असून, मूल्यवíधत कर (व्हॅट) कमी करण्याची जबाबदारी राज्यांची आहे. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये व्हॅट कमी होत नसेल तर तिथल्या मतदारांनी राज्य सरकाराला जाब विचारावा, असे सीतारामन म्हणाल्या.