Saturday, March 22, 2025
Homeताजी बातमी९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनला आजपासून कुसुमाग्रज नगरी नाशिक मध्ये...

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनला आजपासून कुसुमाग्रज नगरी नाशिक मध्ये सुरवात…

साहित्य रसिकांचा मेळा आजपासून कुसुमाग्रज नगरीत भरणार आहे. शहराच्या वेशीवर असलेले भुजबळ नॉलेज सिटी हे विविधांगी कलाकृतींनी नटलेले आहे. ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देशातील महत्वाचे साहित्यिक, लोकप्रतिनिधी आणि रसिकांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.

लोकहितवादी मंडळाने आयोजित केलेले हे संमेलन यशस्वी होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण नाशिककरांना या सोहळ्याच्या निमित्ताने साहित्याचा जागर करण्याची संधी तब्बल १६ वर्षांनी मिळाली आहे.

सायंकाळी साडेचार वाजता कुसुमाग्रज नगरीतील मुख्य मंडपात ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य साहित्य संमेलनाच्या मुख्य उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर, उद्घाटक विश्वास पाटील आणि स्वागताध्यक्ष तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत.

२०१९ मध्ये उस्मानाबाद येथे झालेल्या ९३व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर ९४ वे नाशिकला व्हावे, अशी मागणी नाशिकच्या सव्वाशे वर्षांचा इतिहास असलेल्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आली होती. वेळोवेळी पाठपुरावा करून हे संमेलन नाशिकच्या नगरीत होणार असा विश्वास वाटत असतानाच सार्वजनिक वाचनालयाच्या काही बाबी न्यायालयीन प्रक्रियेत होत्या; त्यामुळे ऐनवेळी शहरातील लोकहितवादी या छोट्या संस्थेच्या वतीने हे संमेलन घेण्यात येण्याबाबत विचार सुरू झाला होता.

करोना विषाणूच्या पहिल्या लाटेमुळे २०२० साली संमेलन घेता आले नाही; २०२१ मध्ये एप्रिल महिन्यात तारखा, स्थळे जाहीर होऊन संमेलनाची तयारी सुरू झालेली असतानाच करोनाच्या दुसर्‍या लाटेने प्रकोप माजवला; त्यामुळे हे संमेलन पुढे ढकलावे लागले. मध्यंतरी ऑनलाइन घ्यावे की ऑफलाईन घ्यावे, संमेलनाचा जिल्हा बदलावा का तसेच नाशिकमधील नियोजित सोडून दुसरी जागा घ्यावी का याबाबत विचारविनिमय सुरू होता. अखेर आयोजकांनी केलेल्या प्रयत्नांना आणि पाठपुराव्याला यश येऊन ऑफलाईन संमेलन नाशिक येथेच होणार असल्याची घोषणा झाली आणि त्यानंतर फक्त संमेलनस्थळात बदल होऊन ते भुजबळ नॉलेज सिटी येथे कुसुमाग्रज नगरीच्या रूपाने तयार झाले.

संमेलनाच्या निमित्ताने वाद-प्रतिवाद होत असतानाच मराठी साहित्याचा जागर होत आहे. प्रकाशकांना देखील करोनामुळे प्रमाणबद्ध झालेला आपला व्यवसाय वाढविण्याची संधी प्राप्त झाली आहे तसेच रसिकांना देखील आवडी निवडीचे साहित्य तसेच मान्यवरांची भाषणे, परिसंवाद ऐकण्याची संधी या संमेलनाने पुढ्यात आणून ठेवलेली आहे. आयोजकांनी अहोरात्र मेहनत घेत हा सोहळा यशस्वी करण्यासाठी योगदान दिले आहे. संमेलनावर जरी करोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटचे सावट आणि भारतीय हवामान विभागाने ४ तारखेपर्यंत पावसाचा इशारा दिलेला असला तरी त्याचा कोणताही परिणाम संमेलनावर होणार नसल्याचे स्वागताध्यक्षांसह आयोजकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे १६ वर्षांनी सारस्वतांनी गजबजणारी नगरी एक सकारात्मक संदेश जनतेपर्यंत नक्की पोहचवेल.

आज संमेलनात

शहरात कुसुमाग्रज निवासस्थानापासून निघालेली ग्रंथदिंडी सीबीएस, शालिमार मार्गे नेहरू गार्डन जवळील सार्वजनिक वाचनालयात पोहचेल. शहरात दिंडी मार्गावर ग्रंथदिंडी दरम्यान नो व्हेईकल मार्ग घोषित करण्यात आलेला आहे. तेथून बसने कुसुमाग्रज नगरीत रसिक पोहचतील.

सकाळी अकरा वाजेला साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते साहित्यनगरीच्या प्रवेशद्वारावर ध्वजारोहन होईल. तसेच विजयराव बोधनकर यांच्या हस्ते कला प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. या कार्यक्रमाला विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

सकाळी साडे अकरा वाजेला संमेलनाचे मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शन येथे ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून रावसाहेब कसबे यांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच नाशिक लेखक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. गो. तू. पाटील यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमाला कवी नरेश महाजन आणि प्राचार्य डॉ.राम कुलकर्णी हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

दुपारी बारा वाजता अभिजात मराठी दालनाचे उद्घाटन कुसुमाग्रजनगरी येथील मध्यवर्ती हिरवळीवर सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित, मराठी भाषा प्रधान सचिव भूषण गगराणी तसेच सहसचिव मिलिंद गवांदे यांची उपस्थिती लाभणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine
Google search engine

Most Popular

Recent Comments