पिंपरी- चिंचवड शहराची तहान भागवणारे पवना धरण ९२.२७ टक्के भरले असून वीज निर्मिती गृहाद्वारे १४०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग अकराच्या सुमारास करण्यात येणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पवना धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी धरण क्षमतेच्या ९२.२७ टक्के भरले असून आजपासून अधिकारी पवना नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करतील.
गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून पवना नदीत १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होणार असल्याचे धरण अधिकाऱ्यांनी सांगितले. पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यास येत्या २४ ते ४८ तासांत विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
“नदीच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी त्यांची जनावरे आणि इतर सामान नदीपात्रातून काढून टाकावे. कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.